मुंबई : फिटनेस आणि दिलखुलास अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री Mandira Bedi मंदिरा बेदी आणि तिचा पती राज कौशल यांनी एक मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही इच्छा फक्त मनोमनी न बाळगता आता या सेलिब्रिटी जोडीनं ती सत्यातही उतरवली आहे. मुख्य म्हणजे पतीसह मिळून घेतलेल्या या निर्णयासाठी मंदिराचं कौतुकही केलं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी- टाऊनच्या या अभिनेत्रीनं चार वर्षांच्या एका मुलीला दत्तक घेत तिला एक नवी ओळख देऊ केली आहे. अतिशय सुरेख अशआ भावनिक कॅप्शन आणि तितक्याच छानशा फोटोसह मंदिरानं याबाबतची माहिती सर्वांनाच दिली. आपल्या मुलीसोबतचं नातं तिनं या कॅप्शनमध्ये शब्दांवाटे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 


तारा, असं मंदिराच्या मुलीचं नाव. तिची ओळख करुन देताना मंदिरा लिहिते, 'देवाच्या आशीर्वादाप्रमाणंच ती आमच्याकडे आली. आमची लहान मुलगी, तारा. चार वर्षांहून काहीच दिवस मोठ्या असणाऱ्या या चिमुरडीच्या डोळ्यांत जणू तारेच आहेत. वीरची ही बहीण आहे. तिला आम्ही अगदी मनमोकळेपणानं आणि तितक्याच प्रेमानं आपलसं करत आहोत'. 


मुलीचं स्वागत करणाऱ्या मंदिरानं ती नेमकी आपल्या कुटुंबात केव्हा आली, याबाबतही सांगितलं. तिनं ही पोस्ट करताच नेटकऱ्यांनी मोठ्या आनंदानं ताराचं स्वागत करत मंदिराच्याही या निर्णय़ाला दाद दिली.



 


मंदिरा बेदी आणि राज कौशल १९९९ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. ज्यानंतर या जोडीच्या आयुष्यात २०११ मध्ये वीर या त्यांच्या मुलाचं आगमन झालं. काही महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत मंदिरानं तिचं मातृत्त्वं लांबणीवर टाकलं होतं. पण, हा आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा निर्णय असल्याचं सांगितलं. किंबहुना करिअरला प्राधान्य देणारी महिला अशीच मंदिराची प्रतिमाही तयार झाली होती. सोशल मीडियावर ती प्रभावी व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी असून कायमच इतरांपुढे काही आदर्श प्रस्थापित करत असते.