मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांनी एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर आता ही जोडी १ डिसेंबरला जोधपूरमधील उमेदभवन पॅलेस येथे ख्रिस्तधर्म पद्धतीने विवाहबद्ध झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियांका आणि निक हे ख्रिश्चन आणि भारतीय हिंदू विवाहपद्धतीत सहजीवनाची शपथ घेत असतानाच संपूर्ण जोधपूर आणि विवाहस्थळ परिसरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था केल्याचं पाहायला मिळत आहे. पण, या साऱ्यामध्ये माध्यमं आणि उमेदभवन पॅलेसबाहेर असणाऱ्या सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. 


'अमर उजाला'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार उमेदभवनपासून काही किलोमीटरच्याच अंतरावर असणाऱ्या राम मंदिर भागात ही घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


ज्यामध्ये माध्यमांचे प्रतिनिधी संतप्त दिसत असून सुरक्षा रक्षकांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाल्याचं कळत आहे. त्यामुळे एका अर्थी 'देसी गर्ल'च्या विवाहसोहळ्याला कुठेतरी गालबोट लागल्याचं कळत आहे. 



मुख्य म्हणजे माध्यमांशी खास नातं जपणाऱ्या कलाकारांच्या यादीत प्रियांकाच्या नावाचाही समावेश होतो. पण, आता तिच्याच विवाहसोहळ्याच्या वेळी झालेल्या या साऱ्या प्रकाराविषयी माहिती मिळाल्यानंतर ती या साऱ्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. 


दरम्यान, प्रियांका आणि निकने आपल्या कुटुंबीयांच्या आणि काही खास मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाहबद्ध होत एकमेकांची साथ देण्याची वचनं दिली. त्यांचं लग्न होताच उमेदभवन येथे मोठ्या प्रमाणावर आकर्षक अशी आतिषबाजी करण्यात आली. ज्यानंतर प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही सुरेख फोटोही पोस्ट केेले.