HAPPILY MARRIED : `गेम ऑफ थ्रोन्स` फेम अभिनेत्रीशी प्रियांकाचा दीर अडकला विवाहबंधनात
फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
मुंबई : 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. भावाच्या लग्नाच्या निमित्ताने प्रियांका मायदेशी परतली होती. पण, या लग्नाचीच तारीख पुढे ढकलल्यामुळे ती पुन्हा अमेरिकेला रवाना झाली. 'देसी गर्ल' प्रियांका अमेरिकेला परतली असली तरीही लग्नसराईपासून काही ती दूर गेलेली नाही असंच चित्र दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडिओ पाहता प्रियांकाचा दीर म्हणजेच अमेरिकन गायक निक जोनास याचा भाऊ जो जोनास विवाहबंधनात अडकल्याचं कळत आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स' फेम सोफी टर्नर हिच्यासोबत एका खासगी सोहळ्यात त्या दोघांनी ख्रिस्ती धर्म पद्धतीनुसार लग्न केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
लास वेगस येथे पार पडलेल्या 'बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स'ला हजेरी लावत जो ला पाठिंबा देणाऱ्या सोफीने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या सहजीवनाच्या प्रवासाची सुरुवात केल्याचं वृत्त E! News ने प्रसिद्ध केल्याचं म्हटलं जात आहे. इतकच नव्हे तर, सुत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसा १ मे रोजी या जोडीची विवाहनोंदणीही करण्यात आली. किंबहुना त्याआधी ते छोटेखानी सोहळ्यात विवाबंधनता अडकले होते. डीजे डीप्लोनेही त्यांच्या लग्नाचं हे वृत्त अधिकृत असल्याचं त्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं.
'गेम ऑफ थ्रोन्स'मुळे सोफीही बरीच प्रकाशझोतात आली आहे. तर जो त्याच्या दोन्ही भावंडांसमवेत संगीत क्षेत्रात बराच सक्रिय आहे. त्यातही प्रियांका चोप्राच्या नावाशी या सेलिब्रिटी कुटुंबाचं नाव जोडलं गेल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या वर्तुळातही सध्या या जोडीच्या लग्नाविषयी शुभेच्छा आणि चर्चांना उधाण आलं आहे. २०१७ मध्येच त्या दोघांनी पुढी आयुष्य एकत्रितपणे व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता. येत्या काही दिवसांमध्ये ते आणखी एका दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्याला सोफीच्या खास मैत्रिणीचीही उपस्थिती असेल.