अभिनेत्यावर का आली ऋषीकेशमध्ये जाऊन ढाब्यावर ऑम्लेट बनवण्याची वेळ?
खासगी आयुष्यात आलेल्या वादळामुळं या कलाकारालाही परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं होतं.
मुंबई : जीवनाच्या प्रवासात सारंकाही सुरळीत सुरु आहे, असं वाटत असतानाच ही घडी अशी काही विस्कटते, की जीवनात नेमकं काय सुरु आहे याची कल्पनाही करणं कठीण होऊन जातं. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या एका कलाकारासोबत असंच घडलं.
बॉलिवूड चित्रपटांतून भूमिका साकारत आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय देण्यालाच या अभिनेत्यानं प्राधान्य दिलं. कलाकारांच्या शर्यतीची तमा न बाळगता स्वत:च्या कारकिर्दीत संतुष्ट असल्याचंच तो अभिनेता कायम म्हणतो. पण, खासगी आयुष्यात आलेल्या वादळामुळं या कलाकारालाही परिस्थितीपुढे हतबल व्हावं लागलं होतं.
हा अभिनेता म्हणजे संजय मिश्रा. वडिलांच्या निधनानंतर संजय मिश्रा यांच्या जीवनात बऱ्याच अडचणी आल्या. त्यांनाही आजारपणानं ग्रासलं. जीवनातून एक - एक गोष्टी निसटू लागल्या होत्या, एका मुलाखतीदरम्यान, त्यांनी याबाबतचा खुलासा केला. त्याचवेळी त्यांनी ऋषीकेश येथे जाऊन गंगा किनारी असणाऱ्या एका ढाब्यावर ऑम्लेट बनवण्याचं काम सुरु केलं. ढाब्याच्या मालकानं त्यांना दररोज 50 कप स्वच्छ करण्यास सांगितले. ज्यासाठी त्यांना 150 रुपये देण्यात येणार होते. तेव्हा जगण्यासाठी पैशांची गरज असल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली.
ढाब्यावर काम केल्यानंतर एका दिवसातच लोकांनी मिश्रा यांना ओळखण्यास सुरुवात केली. तुम्ही तेच ना, गोलमालमध्ये काम केलेले? असं म्हणून लोकं त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी येऊ लागले. त्याचदरम्यान संजय मिश्रा यांना एक असा फोन आला, ज्यामुळं त्यांचं आयुष्य बदललं. 'ऑल द बेस्ट' या चित्रपटातील भूमिकेसाठी मिश्रा यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. रोहित शेट्टीच्या त्या एका फोन कॉलनं मिश्रा यांचं आयुष्य बदललं हेच खरं....