मुंबई : जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात गुरुवारी एका आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. जवानांच्या प्राणांची आहूती आणि देशावर झालेला हा हल्ला पाहून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पुलवामा हल्ल्याचा निशेध करत त्यांनी पाकिस्तानवरही निशाणा साधला आहे. पाकिस्तानशी असणाऱ्या सांस्कृतीक संबंधांविषयी त्यांनी एक लक्षवेधी विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा हल्ला अतिशय वेदनादायी होता असं, म्हणत आता सांस्कृतिक देवाणघेवाण थांबवण्यात आली पाहिजे, असं त्यांनी ट्विट करत लिहिलं. 'पुलवामात झालेला हल्ला पाहता पाकिस्तानशी कोणत्याच प्रकारची सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू ठेवण्याची गरज नाही. कारण, इथे आपल्या जवानांचे प्राण पणाला लागले आहेत', असं लिहित त्यांनी आपण शहीदांच्या कुटुंबासोबत असल्याची भावना व्यक्त केली. 





आझमी यांनी ट्विट करत दोन्ही देशांतील नागरिक हे परिस्थितीमुळे विभागले गेले असून, मुळात त्यांचा या साऱ्याशी काही संबंधही नाही ही बाबही अधोरेखित केली. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांना पाकिस्तानकडून एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं होतं. पण, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील या कार्यक्रमाला न जाण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला. आझमी यांच्यासोबतच इतरही कलाकारांनी पुलवामान हल्ल्याचा निषेध केला. शिवाय पाकिस्तानी कलाकारांना भारतात असणाऱ्या बंदीचंही समर्थन केलं.