पाहा मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पा शेट्टीचा TikTok व्हिडिओ
तिचा नवा व्हिडिओ जरा खास आहे, कारण...
मुंबई : TikTok या ऍपने साऱ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. सर्वसामान्य नेटकरी म्हणू नका किंवा मग सेलिब्रिटी मंडळी. प्रत्येकजण या ऍपच्या सहाय्याने काही अफलातून व्हिडिओ शेअर करत असतो. अभिनेत्री शिल्पा शेट्टीही अशाच काहीजणांपैकी एक. शिल्पा टीकटॉकवर सहसा काही व्हिडिओ तयार करत असते. पण, तिचा नवा व्हिडिओ जरा खास आहे.
हा व्हिडिओ खास असण्याचं कारण म्हणजे तिनं एका मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर सुरेख अशी अदाकारी सादर केली आहे. काही दिवसांपूर्वीच झी मराठी या वाहिनीवर सुरु झालेल्या 'माझा होशील ना' या मालिकेच्या शीर्षक गीताचं नवं रुप तिनं सर्वांपुढे आणलं आहे.
'नको चंद्र तारे....' असे बोल असणाऱ्या या सुरेख शीर्षगीताच्या तालावर शिल्पा तिच्या चेहऱ्याच्या हावभावांनी सर्वांनाच घायाळ करत आहे. हा व्हिहिओ पोस्ट करत तिनं त्याचं कॅप्शनही मराठीमयध्ये लिहिलं आहे. 'तुमच्यासाठी, मी मराठी.... कसे वाटले हावभाव?', असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. तिच्या या व्हिडिओला ७५ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर, अनेकांनी त्यावर कमेंटही केली आहे.
@theshilpashetty
Tumcha saathi, mi Marathi... kasha vaatle haav bhaav??? ##Marathi ##marathimulgi ##betweenshots ##fyp
♬ original sound - Zee Marathi Official
'माझा होशील ना' या मालिकेला सुरुवातीपासून प्रेक्षकांनी पसंती मिळत असतानाच, शीर्षकगीताचीही बरीच चर्चा होत आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकरनं गायलं आहे. झी मराठीच्या अनेक लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीतं आणि त्यांची लोकप्रियता याविषयी वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. त्याच शीर्षकगीतांमध्ये आता 'माझा होशील ना'च्या शीर्षकगीताचाही समावेश झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.