बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) एकेकाळी नात्यात होते. दोघे जवळपास लग्न करणार होते. पण सोमी अलीसह (Somy Ali) चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान संगीताची फसवणूक करत सोमीला भेटत होता. असं म्हटलं जातं की संगीताने सलमान खानला सोमी अलीच्या घऱी फसवणूक करताना पकडलं होतं. सोमी अलीनेही एका मुलाखतीत याला दुजोरा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सोमी अलीने हे 100 टक्के खरं असल्याचं सांगितलं आहे. तिने सांगितलं की, "मी तेव्हा विद्यांचलमध्ये (उत्तर प्रदेश) राहत होती. सलमान पाईपवरुन चढून खिडकीतून माझ्या रुममध्ये येत असे. मला सलमान खानचं ते वागणं फार रोमँटिक वाटायचं. ते दोन बेडरुमचं अपार्टमेंट होतं. मला आठवतं एकदा तो सकाळी 10.30 वाजता माझ्या घऱी आला होता आणि ही घटना घडली होती. तो तेव्हाही संगीताला डेट करत होता. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या".


"सलमान खान आणि मी माझ्या रुममध्ये बसून गप्पा मारत असतानाच तिथे अचानक संगीता पोहोचली होती. तिने सलमानकडे पाहिलं आणि आता बस झालं, तुला एक काहीतरी निवडावं लागेल असं म्हटलं. सलमान खान मला 10 मिनिटात परत येतो सांगून गेला. लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या असल्याने तो संगीताशी लग्न करण्याचा निर्णय घेईल असं मला वाटलं होतं. पण तो काही वेळाने रुमवर परत आला आणि मी संगीताशी ब्रेकअप केला असून मला तुझ्यासोबत राहायचं आहे असं सांगितलं. मला ते माझं नशीब आहे असं वाटलं," अशी माहिती सोमी अलीने दिली.


सोमीने यावेळी सलमानसोबतच्या तिच्या गोड आठवणींना उजाळा दिला आणि म्हणाली, “जेव्हा आम्ही आमच्या पहिल्या चित्रपटासाठी एकत्र शूटिंग करत होतो, जो शेवटी रद्द झाला, तेव्हा मी त्याला एक फोटो दाखवला आणि सांगितलं की मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी भारतात आलीआहे आणि मला अभिनयात रस नाही. त्याने हसून मला सांगितलं की त्याची आधीच एक गर्लफ्रेंड आहे. मी म्हणाले, ‘त्याने काही फरक पडत नाही, आपण एकत्र राहणार आहोत. आपलं नशीब अपरिहार्य आहे, तू फक्त पाहत राहा’. पण मी एक मूर्ख मुलगी होतो जी सलमानसाठी फ्लोरिडा सोडून भारतात आली होती. असं कोण करतं?".


सोमीने यावेळी आपण काही वर्षांनी लग्न मोडल्याबद्दल संगीताची माफी मागितल्याचाही खुलासा केला. “मी तिला सांगितलं की मला मनापासून खूप वाईट वाटत आहे. तेव्हा मी लहान होते आणि मी काय करत होते हे मला माहीत नव्हते. तिने मला सांगितलं की 'मला काही फरक पडत नाही, मी अझर (अझरुद्दीन, क्रिकेटर) सोबत आनंदाने लग्न केलं आहे'. पण पुढच्याच महिन्यात तिने त्याच्यापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला". 


"मला माहित होतं की 16 वर्षांच्या सोमी अलीने जे केलं ते चुकीचं होतं. तिने लग्न मोडलं. मला मनाचा मोटेपणा दाखवत संगीताची माफी मागायची होती,” असं सोमी पुढे म्हणाली. यावेळी तिने सलमान खानने जेव्हा ऐश्वर्या रायसह काम केलं तेव्हाच बॅग पॅक करुन जायची वेळ आली आहे हे समजलं होतं असं सांगितलं.