मुंबई : एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी हल्ली अमुक एका दुकानात जाण्यापेक्षा अवघ्या एका क्लिवरच सारंकाही साध्य होत आहे. घरगुती साहित्यापासून ते विविध उपकरणांपर्यंत प्रत्येक लहानसहान गोष्टी असंख्य ई- कॉमर्स साइटवर उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वाधिक विश्वासू साईट कोणती, विचारलं असता बहुतांश ग्राहक किंवा युजर्स अॅमेझॉनचं नाव सांगतात. पण.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आपकी दुकान....' असं म्हणत ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करणाऱ्या अॅमेझॉनकडून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. दर दिवसाआड कोणीतरी त्यांच्या ऑर्डरमध्ये करण्यात आलेली फेरफार, गडबड, चुकीच्या ऑर्डर याविषयी सोशल मीडियावर माहिती देत तक्रारीसाठी अॅमेझॉनचं दार ठोठावत आहे. यात आता एका अभिनेत्रीलाही फटका बसला आहे. 


अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत अॅमेझॉनकडून तिची फसवणूक करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणली. सोनाक्षीने या साईटवरुन BOSE या कंपनीचे हेडफोन्स मागवले होते. तिच्यापर्यंत ही ऑर्डर पोहोचलीसुद्धा. पण, हेडफोनचा बॉक्स उघडताच तिला मिळाला तो म्हणजे गंज चढलेला लोखंडाचा एक तुकडा. 


कोऱ्याकरकरीत आणि प्रतिष्ठीत ब्रँडच्या बॉक्समध्ये असणारा हा तुकडा पाहून काही क्षणांसाठी तिला धक्काच बसला. तिने लगेचच ही बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून अॅमेझॉनच्या लक्षात आणून देत नाराजी व्यक्त केली. तिची तक्रार पाहता, अॅमेझॉनकडून या तक्रारीचं निवारण करण्याचं आश्वासनही दिलं. मुख्य म्हणजे या संकेतस्थाळाच्या कस्टमर केअर सर्विसकडून आपल्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचा मुद्दाही तिने आपल्या ट्विटच्या माध्यमातून मांडला होता. 



सोनाक्षीने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनीच, अॅमेझॉनवर कोणासोबतही भेदभाव केला जात नाही, अलं म्हणत उपरोधिक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं. पण, हे प्रकरण आणि त्याचं गांभीर्य पाहता आपल्या युजर्सचा विश्वास परत मिळवण्यात अॅमेझॉनला यश मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.