wedding anniversary : सहजीवनाच्या वर्षपूर्तीनिमित्त आनंदने सांगितली सोनमची नवी ओळख
काही सुरेख फोटो पोस्ट करत आनंद म्हणाला....
मुंबई : हिंदी कलाविश्वात फॅशनची परिभाषा बदलत नेहमीच चौकटीबाहेरचे प्रयोग करण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. फॅशनिस्ता या नावाने सोनम प्रसिद्ध झाली. तिने या विश्वात स्वत:ची अशी वेगळी ओळखही प्रस्थापित केली. कारकिर्दीच्या एका टप्प्यावर आल्यानंतर सोनमने तिचा प्रियकर अहूजा याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या याच नात्याला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. सोनमच्या आयुष्यात एक वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने अधिकृतपणे आनंद आला होता, अशा प्रतिक्रियाच चाहत्यांनी तिच्या लग्नानंतर दिल्या होत्या.
सहजीवनाच्या याच क्षणांना पुन्हा उजाळा देत आणि या खास प्रवासाच्या वर्षपूर्तीनिमित्त सोनमच्या पतीने म्हणजेच आनंदने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. काही छायाचित्र पोस्ट करत त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिचं आपल्या जीवनातील स्थान नेमकं काय आणि कसं आहे, याविषयीच्य़ा भावनांना वाट मोकळी करुन दिली.
आनंदने पोस्ट केलेले हे फोटोही तितकेच खास. त्याने चक्क विविध प्रकारचे आणि ब्रँडचे बूट घातल्यानंतर सोनमसोबत काढलेले फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टमध्ये त्यांचा पायांचाच भाग दिसत आहे. हे असे फोटो पोस्ट करण्यामागचं कारणंही त्याने स्पष्ट केलं आहे. 'हे फोटो पोस्ट करण्याचा अर्थ असाच नही की मला शूजचं वेड आहे. पण, मी हे फोटो पोस्ट करत आहे कारण, असं पायांकडे (खाली) पाहणं मला नेहमीच समजंस आणि आपण काय आहोत याची जाणिव करुन देतं. प्रत्येक गोष्टीप्रती आपण कृतज्ञ असल्याची भावनाही यामुळे कायम स्मरणात राहते', असा सुरेख संदेश त्याने दिला.
एक वर्षाचं वैवाहिक आयुष्य आणि त्यापूर्वी जवळपास तीन वर्षांचं रिलेशनशिप या साऱ्या आठवणी पुन्हा जागवत एक मैत्रीण, पाठिंबा देणारी व्यक्ती, समर्थ करणारी सहचारिणी आणि वेळ पडल्यास, आपण चुकत असल्यास वेळीच चूक निदर्शनास आणणारी एक व्यक्ती म्हणून कोणाचीतरी साथ लाभणं हे आशिर्वादाहून कमी नाही, असे भाव त्याने व्यक्त केले. या पोस्टमध्ये त्याने सोनमचा उल्लेख guiding star म्हणूनही केला आहे.
आनंदच्या आयुष्यात वेळोवेळी त्याचा दिशा देणारी ही त्याची पत्नी आणि त्यांचं हे सुरेख नातं पाहता चाहत्यांनीही त्यांना लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आनंदच्या या पोस्टनंतर आता सोनम त्यांच्या या खास प्रवाचाविषयी काही सांगते का, याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे.