मुंबई : हिंदी  कलाविश्वात फार कमी वेळात आपलं स्थान कामय करणारी अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या कामासोबतच कुटुंबाची जबाबदारीही अगदी सुरेखपणे पार पाडत असते. याचाच प्रत्यत तिची सध्याची सोशल मीडियावरील पोस्ट पाहून येत आहे. अभिनेत्री असण्यासोबतच सनी तीन मुलांची आई आहे. निशा, नोआ आणि ऍशर अशी तिच्या मुलांची नावं आहेत. आपल्या याच मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिने सुरेख अशी पोस्ट शेअर करत एक आई म्हणून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोआ आणि ऍशर या दोघांच्याही पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनीने ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने न विसरता निशा या तिच्या मोठ्या मुलीचाही उल्लेख केला आहे. 'आपल्या कुटुंबाप्रती असणाऱ्या भावनांना शब्दांत मांडणं अशक्य आहे. पण, तरीही मी तो प्रयत्न करतेय. नोआ आणि ऍशर यांच्यासोबतचं गेलं एक वर्ष हे खऱ्या अद्वितीय होतं. निशा ही त्या दोघांसाठीही एक उत्तम मोठी बहीण ठरली. किंबहुना तिच्याहून चांगली मोठी बहीण त्यांना मिळूच शकत नव्हती', असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं. 



आपली मुलं म्हणजेच जीवनाला प्रकाशमान करणारी किरणं आहेत, असं लिहित आयुष्यातील प्रत्येक क्षण हा त्यांच्या असण्यामुळे, वावरण्यामुळे कशा प्रकारे आनंददायी झाला आहे, हेसुद्धा तिने शब्दांवाटे मांडलं. एका व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने आपल्या मुलांना पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने पोस्ट केलेला व्हिडिओसुद्धा तितकाच सुरेख आणि लक्षवेधी आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने नोआ, ऍशर आणि निशाची धमाल या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. सोबतच डॅनिअल आणि सनीसुद्धा या आनंदाच्या क्षणांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. 


सनीने तिच्या खासगी आयुष्याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली आहे. मग ते निशाला दत्तक घेणं असो, किंवा नोआ, ऍशरच्या जन्माची बातमी असो. आपल्या मुलांप्रती कमालीची सतर्क असणारी सनी ही पावलोपावली एक आई म्हणून त्यांचं सुरेखरित्या संगोपन करत आहे. या साऱ्यामध्ये तिला साथ मिळतेय ती म्हणजे पती डॅनिअलची.