आमिरच्या `३ इडियट्स`वर प्रश्न उपस्थित केले का? तापसीचा बोचरा सवाल
आगामी चित्रपटातील भूमिकेविषयी टीका होत असल्याचं पाहून तापसी बरसली
मुंबई : प्रयोगशीलतेच्या बळावर दर दिवशी अनेक चित्रपट साकारण्यासाठी कलाकार त्यांचं योगदान देत असतात. अशाच या बॉलिवूडमध्ये येत्या काळात 'सांड की आँख' नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर आता, त्यावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
'सांड की आँख' या चित्रपटामध्ये तापसी आणि भूमी या ६० वर्षांच्या आजीबाईंच्या भूमिकेत दिसत आहेत. हे काही नेटकऱ्यांच्या रुचलेलं नाही. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनीसुद्धा याविषयी नाराजीचा सूर आळवला होता. आपल्या चित्रपटाविषयीच्या या प्रतिक्रिया पाहून तापसी पन्नू हिने आता तिचं स्पष्ट मत सर्वांसमोर ठेवलं आहे. किंबहुना तिने एक प्रश्नही सर्वांसमोर उपस्थित केला आहे.
अनुपम खेर यांच्या 'सारांश' या चित्रपटाविषयी किंवा नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्या आईची भूमिका साकारलेल्या 'मदर इंडिया'विषयी प्रश्न का उपस्थित केले गेले नाहीत? असा प्रश्न तिने सर्वांपुढे ठेवला. शिवाय आमिर खानने '३ इडियट्स' या चित्रपटात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती, तेव्हा त्याविषयी कोणी काहीच विचारलं नाही का? असं म्हणत तापसीने तिची नाराजी व्यक्त केली. येत्या काळात 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातून समलैंगिकाची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या आणि आयुषमान खुरानाची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटावरही प्रश्न मांडले जाणार का, असा थेट सवाल तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला.
चौकटीतून बाहेर पडत काही नवे प्रयोग करु इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देण्याची वृत्ती आपण हरवून बसलो आहोत, ही बाब अधोरेखित करत तापसीने या सर्व प्रकारावर नाराजीचा सूर आळवला. या प्रतिक्रिया आणि टीकेची झोड फक्त आपल्याच चित्रपटासाठी राखीव असतील तर किमान प्रतिक्रिया देण्यासाठी तरी यांना काहीतरी नवा विषय मिळाला, टीका करणाऱ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी तरी या चित्रपटाच्या निमित्ताने काहीतरी नवा विषय मिळाला, असं उपरोधिक मत तिने मांडलं. शिवाय तुमच्या शंकांचं दिवाळीला निरसन होईल तेही थेट दिवाळीला, असं म्हणत 'हम तो आ रहे हैं, इस बार पटाके नही गोलियां बरसाने' हा इशाराच तापसीने दिला.