मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने काही जवळपास १० वर्षांपूर्वी झालेल्या एका प्रसंगाविषयी सर्वांनाच माहिती देत एकच खळबळ माजवली. अभिनेते नाना पाटेकर यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिने केला होता. ज्यानंतर नानांच्या अडचणीतही वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाएकी कलाविश्वातून दिसेनाशी झालेली तनुश्री परतली, तीसुद्धा एका गौप्यस्फोटासह. हे सर्व पाहून कलाविश्वात बऱ्याच चर्चांना उधाण आलं. 


विविध कार्यक्रम आणि चर्चासत्रांमध्येही तिचा वावर वाढला. आपण जे पाऊल उचललं ते करण्यासाठी देवानेच आपली निवड केल्याची प्रतिक्रिया तिने 'रॉयटर्स'शी संवाद साधताना दिली. 


'जी गोष्ट घडायची होती त्याची सुरुवात करण्यासाठी देवानेच माझी निव़ड केली होती', असं ती म्हणाली. 


अनेक महिलांच्या मनावर बऱ्याच गोष्टींचं दडपण असून, त्या एक प्रकारचं ओझं घेऊन जगत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा तिने इथे अधोरेखित केला. 


ख्रिस्तधर्म, बौद्धधर्म, योगविद्या आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या #MeToo चळवळीमुळे आपल्याला झाल्या प्रकरणाविषयी खुलेपणाने बोलण्याची प्रेरणा मिळाली, असं तिने स्पष्ट केलं. 


२००८ मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या सेटवर नानांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचं म्हणत तनुश्रीने त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले. 


नानांनी मात्र या प्रकरणी फार काही बोलण्यात नकार देत तिने केलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


चित्रपट कारकिर्दीत सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये आपल्या समोर आलेल्या या प्रसंगांनतर तनुश्री खिन्न झाली, कलाविश्वावरुन तिचा विश्वास उडाला. ज्यानंतर काम न करण्याच्याच विचाराने तिच्या मनात घर केलं होतं. 


मुंबईमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तनुश्रीने आपल्याला अशा प्रकारे जाहीररित्या कोणत्याही प्रकरणावर वक्तव्य करायचं नव्हतं, असं म्हणाली.  


#MeeToo चळवळ कधी भारतापर्यंत येऊ शकेल का, असा प्रश्न जोपर्यंत आपल्याला विचारला गेला नव्हता तोपर्यंत या साऱ्याची कुठेच वाच्यता करण्यात आली नव्हती, हेसुद्धा तिने इथे स्पष्ट केलं. 


आपण या गोष्टीविषयी फार काही बोललोच नसतो तर अशी कोणतीच चळवळ इथे सुरु झाली नसती याकडेही तिने लक्ष वेधत आता माघार नाही असाच तिचा मनसुबा असल्याचं कळत आहे. सोबतच महिलांनी अशा प्रकरणांवर खुलेपणाने भाष्य करावं अशी मागणी केली.