मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या Coronavirus कोरोना युद्धामध्ये कोविड वॉरियर्सना समाजातील प्रत्येक घटकानं आदरानं पाहिलं. पण, सध्याच्या घडीला मात्र याच कोविड वॉरियर्सवर एका बॉलिवूड अभिनेत्रीनं आगपाखड केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे झरिन खान. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झरिननं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्या माध्यमातून तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबत माहित दिली. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित अशा, लिलावती रुग्णालयात आपल्याला अतिशय अटीतटीच्या प्रसंगी देण्यात आलेला वागणूक अत्यंत निराशाजनक असल्याचा सूर तिनं आळवला.


झरिनच्या आजोबांना अचानकच अस्वस्थ वाटू लागल्यामुळं तिनं तातडीनं त्यांना लिलावती रुग्णालयात नेलं. यावेळी तिच्यासोबत कुटुंबातील काही मंडळीही होती. रुग्णालयात गेल्यानंतर आवश्यक ती स्क्रिनिंगही करण्यात आली. तिच्या आजोबांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही तपासून पाहण्यात आली. ज्यानंतर सर्वकाही सुरळीत असूनही तिच्या आजोबांची कोरोना चाचणी करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं. 


लॉकडाऊन सुरु झाल्यापासून कधीही घराबाहेर न आलेल्या आजोबांना रुग्णालयात आणण्यासाठी म्हणून घराबाहेर आणलं. यामध्ये त्यांच्या शरीराचं तापमान, शरीरातील ऑक्सिजनची पातळी हे सारंकाही व्यवस्थित असतानाही रुग्णालयातील कर्मचारी वर्गानं कोरोना चाचणीचाच आग्रह धरला. या साऱ्या प्रसंगाला तोंड देत असताना अखेर सर्वसामान्यांनाही कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याचा प्रत्यय झरिनला आला. 


मित्रमंडळींकडून आतापर्यंत आपण रुग्णालयांच्या सध्याच्या कारभाराबद्दल ऐकलं होतं. पण, खरंच त्यांनी पैसे कमवण्यासाठी हा व्यवसायच सुरु केला आहे असं म्हणत आवश्यक ते उपचार देण्याचं सोडून रुग्णालयांची ही भूमिका आपल्याला न पटल्याचं तिनं संतप्त शब्दांत सांगितलं. मुख्य म्हणजे रुग्णालयात मिळालेली कर्मचाऱ्यांची उत्तरं पाहता आजोबांवर तेथे उपचार न करता अखेर झरिननं तिच्या आजोबांना घरीच आणून त्यांच्यावर तिला ठाऊक असलेल्या औषधांच्या सहाय्यानं उपचार केले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डॉक्टरांकडे नेत पुढील उपचार करुन घेतले. 



झरिननं थेट सोशल मीडियाचाच आधार घेत दिलेली ही माहिती पाहता कोरोना काळात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयांकडून दिली जाणारी वागणूक, पैसे कमावण्यासाठीच्या रुग्णालयांच्या आक्षेपार्ह भूमिका या साऱ्याला पुन्हा एकदा वाचा फुटली आहे. त्याशिवाय गांभीर्य नक्की कोरोनाचं आहे की पैशांचं, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.