नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खान (shah Rukh khan) याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खान याला एनसीबीनं ताब्यात घेतलं. ड्रग्ज प्रकरणात एका क्रूझवर धाड टाकत एनसीबीनं ही कारवाई केली. ज्यामध्ये आर्यनसह इतर आठ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी रात्री एनसीबीनं केलेल्या या धडक कारवाईदरम्यान, मुनमून धमेचा, अरबाज मर्चंट ही दोन प्रसिद्ध नावंही समोर आली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आर्यन एनसीबीच्या कोठडीत असून, येत्या काळात त्याच्यापुढच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनसीबीच्या माहितीनुसार आर्यनसह ताब्यात असणाऱ्या इतर लोकांकडून कोकेन, चरस आणि एमडी असे नशेचे पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 


एनडीपीएस अॅक्ट 1985 अंतर्गत एनसीबीनं या काहीजणांना ताब्यात घेतलं. आर्यन खानसह इतरांवर नार्कोटिक्स ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सब्सटांसेज अॅक्टच्या आठ-सी, 20-बी, 27 आणि 35 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कलमांमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांना जास्तीत जास्त 1 वर्षाची शिक्षा किंवा 20 हजार रुपयांचा दंड शिक्षा स्वरुपात भरावा लागतो. 


सदर प्रकरणी न्यायालयात पेशी करण्यात आली तेव्हा वकिल अद्वैत सेठना यांनी आर्यनला दोन दिवसांच्या एनसीबी कोठडीत पाठवण्याची मागणी केली होती. पण, न्यायालयानं एकाच दिवसाची मागणी मंजूर केली. आर्यनचे वकिल सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रूजवर आर्यन खानच्या नावे कोणतंच बुकींग नव्हतं. किंबहुना त्याच्याकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला तिथून बोलवणं आल्यामुळंच तो तिथं होता. त्याला फक्त व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारेच अटक करण्यात आली आहे.