मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात असणाऱ्या समीकरणाविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'  या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनोदी फटकेबाजी करणाऱ्या या दोघांनीही प्रेक्षकांमध्ये आपलं असं वेगळं स्थान प्रस्थापित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल आणि सुनीलच्या या नात्यात एक असं वादळ आलं, ज्यानंतर या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. पण, तरीही नात्यात असणारा ओलावा मात्र कमी झालेला नाही. कपिलच्या लग्नाच्या निमित्ताने सुनीलने त्याला शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचे बंध सर्वांनाच पाहायला मिळाले. 


गिन्नी छतरथ हिच्यासोबत कपिल काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकला. ज्यावेळी कपिलच्या काही कलाकार मित्रांची उपस्थिती पाहायला मिळाली. या गर्दीत सुनील मात्र कुठेच दिसला नाही. त्याच्या न येण्याने बऱ्याच प्रश्नांनाही वाचा फुटली. पण, अखेर खुद्द सुनीलनेच कपिलला शुभेच्छा देत या चर्चा शमवल्या.  


कपिलच्या विवाहसोहळ्याच्या वेळी उपस्थित राहू न शकलेल्या सुनीलने त्याला शुभेच्छा देत लिहिलं, 'कपिल आणि गिन्नी भावी वैवाहिक आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्यावर परमात्मा नेहमीच आनंदाची बरसात करो....'
आपल्या मित्राने दिलेल्या या शुभेच्छा पाहून कपिलनेही त्याचे मनापासून आभार मानत, सुनीलची खूप आठवण आल्याचं सांगितलं. सोबतच त्याला आगामी कारकिर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या. 



पुन्हा एकत्र येणार का, कपिल- सुनील? 


वाद आणि मतभेदामुळे कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. पण, येत्या काळात पुन्हा एकत्र येण्याविषयीचा प्रश्न विचारताच येणारा वेळ आणि देवच सारंकाही ठरवेल, असं सुनीलने स्पष्ट केलं. सध्याच्या घडीला आपण आपल्या कार्यक्रमावरच लक्ष केंद्रीत करत असल्याचंही तो पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाला.