मुंबई : महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कितीही पालं उचलली तरीही वास्तुस्थिती मात्र काही वेगळीच असते. जी नाकारता येत नाही. नुकतंच बॉलिवूड दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अभिनेता तिग्मांशू धुलिया याने याविषयी एक धक्कादायक ट्विट करत थेट प्रशासनाचं दार ठोठावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिग्मांशूची भाची रेल्वे प्रवास करत असताना, मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या चौघांनी तिची छेड काढली. मुख्य म्हणजे या प्रसंगी मदतीसाठी देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असतानाही, त्याचा फार फायदा झाला नाही. अखेर तिग्मांशूने ट्विट करत मदत मागितली. 


'माझी भाची उद्यान एक्सप्रेसने बँगलोरच्या दिशेने प्रवास करत आहे. मद्यधुंद अवस्थेतील चौघांनी तिची छेड काढली. आता या प्रसंगी मदतीसाठी देण्यात आलेल्या कोणत्याही क्रमांकावरुन उत्तर येत नाही आहे. माझी भाची फार घाबरली आहे, तिची कोणी मदत करेल का?', असं ट्विट तिग्मांशूने केलं. 




सोशल मीडियावर त्याने हे ट्विट करताच अनेकांनीच त्याच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. कोणी मदतीसाठीचे काही दूरध्वनी क्रमांक दिले, तर सुदैवाने त्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या भाचीला मदत करण्यासही पुढाकार घेतला. काही वेळानंतरच तिग्मांशूने आणखी एक ट्विट केलं. ज्यामध्ये खटाटोप करत अखेर पोलीस त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती दिली. शिवाय आपली भाची सुरक्षित असल्याचंही त्याने या ट्विटमध्ये नमूद केलं. 



वाचा : 'बेसन बर्फी' बनवत नव्वदीपार आजीबाईंनी सुरु केला स्टार्टअप


आपल्या एका ट्विटच्या बळावर अनेकांनीच मदतीसाठी उचललेलं पाऊल पाहता त्याने सर्वांचे आभार मानले. संबंधित विभागांचेही त्याने आभार मानले, पण संपर्क न होऊ शकणाऱ्या 'हेल्पलाईन' विषयी मात्र त्याने खंत व्यक्त केली. तिग्मांशूचं हे ट्विट आणि त्याच्या भाचीवर ओढवलेला प्रसंग पाहता, दैनंदिन जीवनात महिला सुरक्षिततेच्या नावावर आजही काही बाबतीत किती हेळसांड होत आहे हे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आलं आहे.