...अन् रणबीरच्या `त्या` दोन प्रेयसींमध्ये जुळलं मैत्रीतं नातं
येत्या काळात त्याचा हा बेत यशस्वी ठरणार का...?
मुंबई: निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा कलाविश्वात नवोदितांपासून ते अगदी दिग्गज कलाकारांपर्यंत प्रत्येकाचाच खूप चांगला मित्र आहे. करणचं एकंदर वागणं आणि मुख्य म्हणजे विविध कार्यक्रमांसाठी, भेटीगाठींसाठी त्याकडून घेण्यात येणारा पुढाकार या सर्व गोष्टी कळत नकळत करणला खास करुन जातात.
सध्याच्या घडीलासुद्धा तो अशाच काही कामांमध्ये व्यग्र आहे.
'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या निमित्ताने करणने यावेळी एक प्रयोग करत काही अशा जोड्या त्याच्या कार्यक्रमात बोलावल्या ज्याविषयी बरीच चर्चा झाली.
अशाच जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणची.
आलिया आणि दीपिका या अभिनेत्री म्हणून सर्वांनाच ठाऊक आहेत. पण, त्यांना जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे रणबीर कपूर.
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रणबीर हा या दोघींमधील समान दुवा आहे. दीपिकाचं काही वर्षांपूर्वी त्याच्यासोबत असणारं नातं आणि आलियाचं सध्या त्याच्यासोबत असणारं नातं पाहता या दोघींमध्ये काही प्रमाणात संकोचलेपणा असेल, असंच तुम्हालाही वाटत असेल.
पण, तसं नाहीये. करण जोहरच्या चॅट शोच्या पहिल्याच भागात या दोघींमध्ये असणारं सुरेख नातं पाहायला मिळालं. किंबहुना त्यांच्या या घट्ट मैत्रीचं श्रेय करणलाही जातं.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर करणने एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासोबतच शाहरुख खान, आमिर खान आणि खुद्द करण जोहरही दिसला होता.
अतिशय अचानक बेत ठरुन ही मंडळी एका ठिकाणी जमली तेव्हा त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा संकोचलेपणा नव्हता, असं 'कॉफी विथ करण'मध्ये बोलताना खुद्द दीपिका आणि आलियानेच स्पष्ट केलं.
मुख्य म्हणजे नात्यात असणारा थोडाथोडका रुसवाही दूर करण्यासाठी आणि ही मैत्री आणखी दृढ करण्यासाठी म्हणून खुद्द करण आलिया, रणबीर, रणवीर आणि दीपिका यांना एकाच फोटो फ्रेममध्ये एकत्र आणण्यासाठी म्हणून मालदीवच्या निसर्गरम्य बेटांवर नेण्याचा बेत आखत आहे.
त्यामुळे आता येत्या काळात त्याचा हा बेत यशस्वी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.