मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या 'झुंड'  Jhund या चित्रपटाचा फर्स्ट लूक म्हणजेच पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अतिशय दमदार असा या चित्रपटाचा हा पहिलाच पोस्टर कलाविश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागराज पोपटराव मंजुळे असं नाव चित्रपटाच्या पोस्टवर लिहिण्यात आलं आहे. ज्यामवर मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे ही दोन तगडी नावं या चित्रपटाशी जोडली गेल्यामुळे आता प्रेक्षक आणि एकंदरच कलाविश्वाच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही. 



सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार बिग बी हे एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला 'झुंड' हा विजय बारसे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ज्यांनी 'स्लम सॉकर'ची सुरुवात केली होती.



बच्चन या चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ज्यांनी रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ओढ निर्माण केली. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे पहिल्यांदाच कलाविश्वातील महानायकासोबत काम करत आहे. हा चित्रपट आणखी एका कारणामुळेही महत्त्वाचा आहे, ते कारण म्हणजे 'झुंड'च्या निमित्ताने नागराज मंजुळे हिंदी कलाविश्वातही पदार्पण करत आहे.