मुंबई : चौकटीबाहेरच्या चित्रपटांना न्याय देण्यासाठी अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच अग्रस्थानी असते. चित्रपटातील 'हिरोईन'ची साचेबद्ध प्रतिमा मोडित काढणारी ही अभिनेत्री आणखी एका आश्वासक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यात तिला साथ मिळाली आहे ती म्हणजे तोडीस तोड असणाऱ्या अभिनेता राजकुमार राव याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार आणि कंगना यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या ट्रेलरमधून चित्रपटातून नेमकं काय पाहता येणार, याची झलक पाहायला मिळत आहे. एका ह्त्येच्या आरोपाखाली राजकुमार म्हणजेच 'केशव' आणि कंगना म्हणजेच 'बॉबी' हे दोघंही कसे गुंततात आणि नेमकं कथानक पुढे कसं जातं हे चित्रपटातूनच उलगडणार आहे. 


तूर्तास, निर्माते आणि दिग्दर्शकाने मोठ्या शिताफीने ही उत्सुकता ताणून धरत ट्रेलरच्या माध्यमातून प्रेक्षकांना अंदाज बांधण्यास भाग पाडलं आहे. कंगनाच्या आणि राजकुमारच्या अभिनयाची झलक पाहता, 'जजमेंटल है क्या' त्यांच्या कारकिर्दीलाही कलाटणी देणारा चित्रपट ठरु शकतो.. 


'नॉर्मल नही है तू.....' असं म्हटल्यावर बॉबी साकारणाऱ्या कंगनाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे आहेत. तर, 'केशव' जो 'बॉबी'ला प्रचंड आवडतो त्याच्या आय़ुष्याचा प्रवास मात्र एका वेगळ्या वाटेवर आहे. पण, तरीही हे दोघं नेमके कसे धडकतात हे 'जजमेंटल है क्या' मधून पाहता येणार आहे. 



'डेलीसोप क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकता कपूरच्या 'बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड' या निर्मिती संस्थेअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. तर, प्रकाश कोवेलमुडीने चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. २६ जुलै या दिवशी 'जजमेंटल है क्या' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.