मुंबई : Kedarnath day 2 collections २०१३ मध्ये केदारनाथ मंदिर धाम परिसरात झालेल्या महाप्रलयावर प्रकाशझोत टाकत दिग्दर्शक अभिषेक कपूर याने 'केदारनाथ' हा चित्रपट साकारला. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिने या चित्रपटातून पदार्पण करत आपल्या अभिनयाच्या बळावर चाहत्यांची दाद मिळवली. तिला जोड मिळाली ती म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारा आणि सुशांत यांच्यासोबतच इतरही सहकलाकारांच्या अभिनयाच्या आणि कथानकाच्या बळावर 'केदारनाथ'ने पहिल्या दिवशी समाधानकारक कमाई केली. ज्यानंतर दुसऱ्या दिवशीही कमाईचे आकडे उंचावत असल्याचं पाहायला मिळालं. 


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी केदारनाथच्या कमाईचे आकडे वाढत असल्याचं लक्षात आलं. पहिल्या दिवसाच्या तुलनेत या आकड्यांमध्ये ३४.४८ टक्क्यांनी वाढ झाली, असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं. 



'केदारनाथ' या चित्रपटाच्या निमित्ताने सारा अली खान हिच्या रुपात कलाविश्वात एका नव्या चेहऱ्याचं पदार्पण झालं आहे. मुख्य म्हणजे साराचा दुसरा चित्रपटही यामुळे चर्चेत आला असून एकंदरच कलाविश्वात असणारा तिचा सहज वावर सर्वांनाच भावत आहे. साऱ्याच्या मुलाखती असो किंवा एखाद्या कार्यक्रमात तिची उपस्थिती असो, प्रत्येक ठिकाणी एक अभिनेत्री म्हणून तिचा वावर हा प्रशंसनीय ठरत आहे.