Simmba trailer : `या` मराठी कलाकारांसह आला रे आला `सिंबा` आला....
ट्रेलरमध्ये झळकले `हे` मराठी कलाकार...
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित 'सिंबा' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रणवीर झळकणार असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्याविषयी चाहत्यांमध्ये चर्चा पाहायला मिळाली होती. ज्यानंतर अखेर बऱ्याच प्रतिक्षेनंतर 'सिंबा'ची एक भन्नाट झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सिंघमसोबतही 'सिंबा'चं एक वेगळं नातं आहे, हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच लक्षात येत आहे. रणवीर या चित्रपटामध्ये संग्राम भालेराव या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. पिळदार शरीरयष्टी आणि प्रभावी व्यक्तीमत्त्वं असं एकंदर त्याचं रुप या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
'काहीतरी नवीन सांगा...', असं म्हणणारा रणवीरचा अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतोय खरा. पण, त्यासोबतच आणखी एक गोष्ट सर्वांचच लक्ष वेधत आहे. ती म्हणजे मराठी कलाकारांचा सहभाग.
सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, अरुण नलावडे असे मराठी कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. मुख्य म्हणजे इतरही बरेच चेहरे रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात पाहायला मिळत आहेत, त्यामुळे ही मराठी रसिकांसाठी परवणीच आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्यातही रणवीरचा अंदाज म्हणजे 'चार चाँद'.
याआधीही बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर एका मराठमोळ्या व्यक्तीच्या भूमिकेत झळकला होता. त्यामुळे आपल्या येणाऱ्या प्रत्येक भूमिकेचं तो खऱ्या अर्थाने सोनं करतो, हे 'सिंबा'चा ट्रेलर पाहून पुन्हा लक्षात येत आहे.