मुंबई: #MeToo ही चळवळ वर्षभरापूर्वी हॉलिवूडमध्ये सुरु झाली. ज्यानंतर विविध स्तरांवर तिच्याविषयी बोललं जाऊ लागलं. फक्त कलाविश्वच नव्हे तर, सर्वसामान्य महिला वर्गातही याविषयीच्या चर्चा होऊ लागल्या. ज्याअंतर्गत अनेकांनीच आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेत्रीही यात मागे राहिलेल्या नाहीत. आपल्या वाट्याला आलेल्या दुर्दैवी प्रसंगांविषयी भाष्य करत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी काही अशा घटना समोर आणल्या आहेत ज्या पाहून मन खिन्न होऊन जातं. 


अशा या प्रसंगामध्ये आणखी एका अभिनेत्रीने आपल्याला आलेल्या वाईट अनुभवाविषयी सांगितलं आहे. 


राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'स्त्री' या चित्रपटात 'स्त्री'च्याच रुपात झळकलेल्या अभिनेत्रीनेच 'त्या' वाईट अनुभवाविषयी सांगितलं आहे. 


फ्लोरा सैनी (आशा  सैनी) असं त्या अभिनेत्रीचं नाव असून, चित्रपट निर्माता गौरांग दोषी याच्यावर तिने आपल्याला मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. फ्लोराने फेसबुक अकाऊंटवरुन एक भलीमोठी पोस्ट लिहित २००७ मधील काही फोटो पोस्ट केले. ज्या फोटोंमध्ये तिला मारहाण केल्याचं लगेचच लक्षात येत आहे.


तिच्या चेहऱ्यावरील बराच भाग हा काळा पडल्याचं दिसत असून त्यावेळी तिच्या जबड्यालाही दुखापत झाल्याचं पाहायला मिळत आहे.


'व्हॅलेंटाईन्स डे'च्याच दिवशी तिला या साऱ्याचा सामना करावा लागला होता. त्यावेळी गौरांगसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. 


 


गौरांगने मारहाण केल्यानंतर इथेच न थांबता त्याने आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत कलाविश्वात शक्य त्या सर्व वाटा बंद केल्याचं तिने सांगितलं. 


एक वेळ अशी आली होती की फ्लोराला चित्रपटसृष्टीत कोणीही भूमिका देण्यास तयार नव्हतं, तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रींची निवड करण्यात येऊ लागली होती. इतकच नव्हे तर तिला कुठेच ऑडिशन्ससाठीही बोलवण्यात येत नव्हतं. 


फ्लोराने तो काळ आपल्यासाठी अत्यंत अडचणीचा असल्याचं सांगत त्यावेळी अशा ठिकाणी निघून जावंसं वाटत होतं, जिथे आपल्याला कोणीही ओळखत नसेल, इतकं दडपण आणि भीती मनात घर करुन होती, असंही या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 


तिने या पोस्टच्या माध्यमातून लैंगिक अत्याचारांविषयी आवाज उठवणाऱ्या आणि मोठ्या प्रस्थांच्या विरोधात जात त्यांचं खरं रुप सर्वांसमोर आणणाऱ्या सर्वांचंच कौतुक करत त्या सर्वजणी या आपल्यासाठी सुपरहिरो असल्याचंही म्हटलं आहे.