मुंबई : लग्नसराई, ब्रेअप, पॅचअप याविषयीच्या चर्चा बॉलिवूड वर्तुळात वाऱ्यासारख्या पसरतात. याच चर्चांमध्ये सध्या एका सेलिब्रिटी जोडीचं नाव समोर येत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या पुढील भागातून म्हणजेच 'स्टुडंट ऑफ द इयर २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज असणारा तो अभिनेता आहे, आदित्य सील. आदित्य हा अभिनेत्री अनुष्का रंजन हिच्यासोबतच्या त्याच्या रिलेशनशिपमुळे प्रकाशझोतात होता. इतकत नव्हे तर, ही जोडी त्यांच्या नात्याला आता एक वेगळं नाव देणार असून, यंदाच्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्टुडंट ऑफ द इयर २', या चित्रपटातून खलनायकी व्यक्तीरेखा साकारणाऱ्या आदित्यला या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. यापूर्वीही तो काही चित्रपटांमधून झळकला आहे. पण, ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र फारशी प्रभावी कामगिरी करु शकलेले नाहीत. त्यामुळे 'स्टुडंट...' त्याच्या कारकिर्दीला कलाटणी देणार का, हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. 


आदित्य आणि अनुष्काच्या नात्याविषयी सांगावं तर, त्यांनीही काही चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. अनुष्का ही आलिया भट्टची खास मैत्रिणही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्यसोबतचं अनुष्काचं नातं हे आता एका नव्या वळणावर आलं आहे, जिथे ते दोघंही भावी आयुष्याचा विचार करत आहेत. किंबहुना दोघांच्या कुटुंबीयांकडूनही या नात्याविषयी विचारणा होत असून, त्यातील नव्या टप्प्याचा निर्णय घेण्याची विचारणा केली जात आहे. 



आदित्य आणि अनुष्का बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. पण, यंदाच्या व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी त्याने तिला रितसर मागणी घातली आणि सर्वांनाच त्यांच्या रिलेशनशिपची माहिती मिळाली. तेव्हा आता नोव्हेंबर महिन्यातील कोणत्या तारखेला ही सेलिब्रिटी जोडी साखरपुड्याचा मुहूर्त निवडते हे येत्या काळात कळेलच.