अनुष्काला पाहिलं आणि ती रडू लागली
तिला त्यावेळी कसलंच भान राहिलं नव्हतं.
मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. 'सुई-धागा', या चित्रपटातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोलकात्याला गेलं असता तिला एक सुरेख अनुभव आला.
आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीची एकदा तरी भेट घेणं ही प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. अशाच एक चाहतीने अनुष्काची भेट घेतली.
अनुष्काला प्रत्यक्ष समोर पाहून १९ वर्षीय मंजिष्ठा करमाकर हिला अश्रू अनावर झाले. अर्थातच ते आनंदाश्रू होते. मंजिष्ठाला काय बोलावे आणि काय बोलू नये याचंही भान त्यावेळी राहिलं नव्हतं.
तिचे हे भाव पाहून अनुष्काही भारावून गेली आणि तिच्याशी बातचीत केली. मंजिष्ठासोबतच आणखी एका चाहत्यानेही अनुष्काची भेट घेतली.
आपल्यावर असणारं चाहत्यांचं प्रेम पाहून भारावलेल्या अनुष्काने त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या आयुष्याविषयीही काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कलाकार आणि चाहत्याचं नातं नेमकं असतं तरी कसं, याचीच प्रचिती हा व्हिडिओ पाहताना होत आहे.
दरम्यान, ज्या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्काला या चाहतीला भेटता आलं तो 'सुई-धागा' हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.