मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय  कारकिर्दीवर भाष्य करणारा 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची फार आधापासून सुरु झालेली चर्चा काही केल्या शमण्याचं नाव घेत नाही आहे. मग तो काँग्रेस पक्षाचा रोष असो किंवा एखाद्या भूमिकेवर करण्यात आलेल्या टीका असो. देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली होत असतानाच प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील आणखी एक रंजक बाब समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एनडीटीव्ही'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वायपेयी यांची व्यक्तीरेखा साकारण्यासाठी जवळपास ५० कलाकारांच्या ऑडिशन घेण्यात आल्या होत्या. पण, त्यासाठी कोणत्याच कलाकाराची निवड करण्यात आली नाही. चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी दिग्दर्शकांच्या हातात अवघे तीन दिवस उरलेले असताना शेवटच्या क्षणी एका चहा विक्रेत्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. पाहता पाहता त्यांनी ही भूमिका अगदी सुरेखपणे साकारत सर्वांना थक्क केलं. 


चहा विक्रेते अवतार सिंग भारद्वाज या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी यांची व्यक्तीरेखा अगदी हुबेहूब उभी केली आहे. आपल्या या भूमिकेविषयी भारद्वाज म्हणाले, 'मला राजकारणाचा कोणताच अनुभव नाही. पण, मी हसतो तेव्हा अटलजींप्रमाणे दिसतो असं मला अनेकांनीच सांगितलं आहे. मुख्य म्हणजे अटलजींची अनेक वचनं, कविता ऐकण्याचीही मला सवय आहे.' 


कल्पनाही नसताना भारद्वाज यांच्या वाट्याला आलेली ही भूमिका त्यांना आज प्रकाशझोतात आणत आहे. एकिकडे डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर भाष्य करत असतानाच दुसरीकडे चित्रपटातील इतर कलाकार आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका खऱ्या अर्थाने ११ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'च्या यशात हातभार लावणार हे मात्र नक्की.