मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसच्या वैश्विक संकटाला सामोरं जात असतानात प्रसिद्ध संगीतकार प्रितम चक्रवर्ती याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रितमचे वडील, प्रबोध चक्रवर्ती यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. पार्किन्सन आणि अल्झायमर अशा आजारांनी त्यांना ग्रासलं होतं. मागील दोन वर्षांपासून ते रुग्णालयातच असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रबोध चक्रवर्ती यांच्या शेवटच्या क्षणांमध्ये खुद्द प्रितम, त्याची आई आणि त्याची बहिण त्यांच्यासोबत रुग्णालयात होते. महाराष्ट्रातील अंबोली येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी कुटुंबातील मोजक्याच मंडळींची उपस्थिती होती. 


गेल्या काही काळापासून सेलिब्रिटी वर्तुळातील काही प्रसिद्ध चेहरे आणि कित्येक सेलिब्रिटी मंडळींच्या आप्तेष्टांनी जगाचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं. प्रितमच्या वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच, चाहत्यांनी आपल्या आवडीच्या संगीतकाराचं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांत्वन केल्याचं पाहायसा मिळालं. 


 


प्रितमच्या कारकिर्दीविषयी सांगावं तर, येत्या काळात त्याच्या हाताशी एक मोठा चित्रपट आहे. कबीर खान दिग्दर्शित '`83' या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्याच्यावर आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या पहिल्यावहिल्या विश्वचशक विजयावर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. याशिवाय अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातही प्रितमचं संगीत असल्याचं म्हटलं जात आहे.