मुंबई : अनेकदा सोशल मीडियाच्या अवाजवी आणि वायळफळ वापराचं साधन असल्याचा आरोप अनेकदा केला जातो. पण, याच सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अशा कलाकारांना प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचं पुरतं आयुष्यच बदलून जातं. असाच एक चेहरा काही दिवसांपूर्वी सर्वांसमोर आला. तो चेहरा होता, ५५ वर्षीय रानू मारिया मंडल यांचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्यातील एका रेल्वे स्थानकावर अतिशय सुरात 'एक प्यार का नगमा है' हे गाणं गाणाऱ्या रानू यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. ज्यानंतर, सर्वत्र त्यांची चर्चाही सुरु झाली. पुढे रानू यांच्यासाठी अनेकांनी मदीचा हातही दिला. जीवनाला मिळालेल्या अनपेक्षित वळणात आणखी एक भर म्हणजे, रानू यांना थेट एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जात बॉलिवूडमधील संगीत दिग्दर्शकासोबत गाणं रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली आहे. 


तो संगीत दिग्दर्शक म्हणजे हिमेश रेशमिया. हिमेशने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून रानू यांचा गातानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या, 'तेरी मेरी कहानी' हे गाणं गाताना दिसत आहेत. गाणं गात असताना आपण ज्या क्षणात जगत आहोत त्या क्षणाचा पूर्ण आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. 



हिमेश रेशमियाने रानू यांचा व्हिडिओ पोस्ट करत, त्यांच्यासोबत 'तेरी मेरी कहानी' हे गाणं ध्वनीमुद्रीत केल्याची माहिती दिली. कॅप्शनच्या माध्यमातून त्याने रानू यांची प्रशंसाही केली. शिवाय सकारात्मक दृष्टीकोन हा कायमच स्वप्नपूर्तीसाठी मदतीचा ठरतो असा सुरेख संदेशही त्याने दिला.