`कतरिना मला मोठ्या बहिणीसारखी`
कोण म्हणतंय पाहिलं का?
मुंबई : कतरिना कैफ... नुसतं नाव जरी घेतलं की या सुरेख अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणारी कतरिना कैफ ही अनेकांसाठी त्यांची स्वप्नसुंदरी वगैरे आहे. पण, याला एक अपवाद आहे. कारण बी- टाऊनमधील 'या' सेलिब्रिटीसाठी ती चक्क मोठ्या बहिणीप्रमाणे आहे.
कतरिनाला बहीण मानणारा 'हा' आहे तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
जास्त विचार करण्याची गरज नाही. त्या व्यक्तीचं नाव आहे बादशहा. आपल्या अनोख्या शैलीने हिंदी चित्रपटांतील संगीत विश्वात जागा मिळवणाऱ्या कलाकारांमध्ये नाव घ्यायचं झालं तर एक नाव डोळ्यांसमोर येतं. ते नाव म्हणजे रॅपर बादशहा याचं. बादशहा, त्याचे रॅप साँग आणि एकंदरच त्याचा वावर सध्या तरुणाईमध्ये चर्चेचा विषय आहे. पण, अशाही काही गोष्टी आहेत, ज्या बादशहाच्या चाहत्यांना लवकरच माहित होणार आहेत.
अभिनेत्री नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या ऑडिओ चॅट शोच्या निमित्ताने बादशहाने या गोष्टीवरुन पडदा उचलला आहे.
९० च्या दशकातील आवडत्या अभिनेत्रीपासून ते अगदी हिंदी कलाविश्वातील आपल्या सुपरस्टार मोठ्या बहिणीपर्यंत बऱ्याच गोष्टींवर त्याने खुलेपणाने गप्पा मारल्या.
रवीना टंडनच्या सौंदर्यामध्ये आजही एक वेगळीच मादकता आहे, असं म्हणणाऱ्या बादशहाने त्याच्या मोठ्या बहिणीचाही उल्लेख केला.
बादशहासाठी मोठ्या बहिणीच्या स्थानी असणारी ती व्यक्ती म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ.
'एका दौऱ्यावर असताना मला तिच्यात जणू एक मोठी बहीणच दिसली. मी तिला भेटलो त्याचवेळी माझ्या डोक्यात तिच्याविषयी एक वेगला दृष्टीकोन तयार झाला. ती सर्वांचीच खूप जास्त काळजी घेते', असं बादशहा तिच्याविषयी म्हणाला.
कतरिनाविषयीचं त्याचं हे वक्तव्य पाहता आता बी- टाऊनमध्ये खऱ्या अर्थाने एका नव्या भाऊ- बहिणीच्या जोडीची चर्चा होणार असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.