मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्वाईन फ्लूची अनेकांना लागण झाली आहे. यातच आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमी यांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकला झाल्यामुळे नियमित करण्यात येणाऱ्या चाचणीदरम्यान शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं समजलं. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शबाना आजमी यांना रूग्णालयात दाखल केलं असून त्या या वेळेचा स्वत:साठी उपयोग करत आहेत. शबाना यांनी 'मला क्वचितच आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे हा वेळ माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या वेळेचा मी फायदा करून घेणार असल्याचं' त्यांनी म्हटलंय. मी रूग्णालयात दाखल असून माझ्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.


देशभरात स्वाईन फ्लू मोठ्या प्रमाणात प्रसरला आहे. या आजाराची अनेकांना लागण झाली असून अनेक जण यात दगावले आहेत. गेल्या आठवड्यात स्वाईन फ्लूने ८६ जणांचा मृत्यू झाला. तर देशभरात तब्बल नऊ हजारहून अधिक लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. महाराष्ट्रातही २०४ लोकांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून १७ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. राजस्थानात स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. रविवारी आलेल्या आकड्यांनुसार, देशात आतापर्यंत ९ हजार ३६७ लोकांना स्वाईन फ्लू झाला आहे.