चमचेगिरी... म्हणत हिणवणाऱ्यांना `पद्मश्री` विजेत्या अदनान सामीचं सडेतोड उत्तर
अरे बाळा..
मुंबई : लोकप्रिय गायक अदनान सामी याला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या वादाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सामीला या पुरस्कारसाठी पात्र ठरवण्याच्या निर्णयावर निशाणा साधत काँग्रेसक़डून यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं. सरकारची चमचेगिरी, म्हणजेच हा बहुमान मिळण्याचा नवा मापदंड जणू अशी भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली होती.
कारगिल युद्धात सहभागी झालेल्या सनाउल्लाह यांना घुसखोर म्हणून का सिद्ध करण्यात आलं? वायुदलात असूनही भारताविरोधी गोळीबार करणाऱ्या सामीला पद्म पुरस्कार का दिला जात आहे? असे प्रश्न काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल यांनी उपस्थित केले. ज्यावर आता खुद्द सामीनेच थेट उत्तर दिलं आहे.
'अरे बाळा तुझा मेंदू (तुझी बुद्धी) क्लीयरंन्स सेल किंवा सेकंड हँड नॉव्हेल्टी स्टोअरमधून खरेदी करण्यात आली आहे का? बर्कलेमध्ये असंच शिकवण्यात आलं होतं का, की आईवडिलांच्या कर्मांसाठी मुलाला उत्तरदायी ठरवावं? तुम्ही तर वकील आहात. कायद्याचं शिक्षण घेतेवेळी हेच शिकवलं होतं का?', असं ट्विट करत उपरोधी सुरात सामीने शेरगिल यांना शुभेच्छाही दिल्या.
वाचा :...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
दरम्यान, सामीला पुरस्कार देण्याचा वाद आता टोकाला पोहोचल्याचं तित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या टीकेला अदनान सामीने प्रत्युत्तर दिलं असलं तरीही, पुरस्कार देण्यासाठी भारतीय मुस्लिम कमी होते का, असा सवाल राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. तेव्हा आता मनसेमागोमाग काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही या वादात उडी घेतली आहे हेच स्पष्ट होत आहे.