प्रियांकाने निकबाबत सांगितलं लग्नातलं सिक्रेट
....अन् स्वत:च्याच विवाहसोहळ्यात
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास हे दोघंही २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियांका आणि निकने त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं होतं. ख्रिस्ती आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतींमध्ये या सेलिब्रिटी जोडीची लग्नगाठ बांधली गेली होती.
प्रियांकाचा विवाहसोहळा म्हणजे जणू एक चित्रपटच होता. क्रिकेट सामन्यापासून परदेशातून येणारा नवरदेव, त्याच्यासाठी नव्या असणाऱ्या काही रुढी परंपरा असं एकंदर चित्र तिच्या या विवाहसोहळ्यात पाहायला मिळालं होतं.
मुख्य म्हणजे लग्नसोहळ्यात निकला कामही करावं लागलं. मुंबई मिररच्या वृत्तानुसार खुद्द प्रियांकानेच ही बाब सर्वांसमोर आणली. तिच्या सांगण्यानुसार निक हा लग्नसोहळ्याच्या दहा दिवस आधीच भारतात आला होता.
'ते सारे (निक आणि त्याचे कुटुंबीय) दहा दिवस आधीच भारतात आले होते. इथे सुरु असणाऱ्या तयारीत काही मदत लागते का, हे पाहत कामात हातभार लावण्यासाठी ते आले होते. मी माझं काम ठरलेल्या वेळात पूर्ण करावं, यासाठीच हे सारं सुरु होतं. यादरम्यान निकने चक्क सिलिंडर उचलण्याचंही काम केलं होतं', असं प्रियांका म्हणाली.
निकच्या कुटुंबीयांसाठी भारतीय रुढी- परंपरा नव्या होत्या. हे सांगत त्यांना जयमालेचा विधी म्हणजे जणू हाणामारीसाठी कोणीतरी आपल्याला बोलवलं आहे, असंच वाटल्याचा खुलासा तिने केला. काही दिवसांनीच प्रियांका आणि निक त्यांच्या या वैवाहिक आयुष्याचं एक वर्ष साजरा करणार आहेत. गेल्या वर्षीच डिसेंबर महिन्यात जोधपूर येथील उमेदभवन पॅलेसमध्ये अतिशय दिमाखदार सोहळ्यात त्यांची लग्नगाठ बांधली गेली होती. आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात या विवाहसोहळ्याविषयीच्या बऱ्याच चर्चा आणि कुतूहल पाहायला मिळालं होतं.