`छपाक`च्या मार्गातील अडथळा दूर
चित्रपट प्रदर्शनाच्या स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांकडून मागे...
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'छपाक' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. राकेश भारती नावाच्या एका लेखकाने 'छपाक' चित्रपटावर स्थगितीसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळा दूर झाला असून चित्रपटावरील स्थगितीची मागणी याचिकाकर्त्यांनी मागे घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या, सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइट कसा असू शकतो, अशा प्रश्नानंतर याचिकाकर्त्यांनी बुधवारी 'छपाक'वरील स्तगितीबाबतची याचिका मागे घेतली आहे.
ऑसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारलेल्या या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप चित्रपटाच्या निर्मात्यांवर करण्यात आला होता. ही कथा सर्वप्रथम आपणच लिहिली होती आणि त्या आधारावर ‘ब्लॅक डे’ नावाची पटकथा इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (इम्पा) नोंदणीकृतही केलेली होती, असा दावा लेखक राकेश भारती यांनी केला होता.
मंगळवारी 'छपाक' चित्रपटाच्या दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी, कायद्यानुसार सत्यघटनेवर आधारित चित्रपटाच्या कथेवर कॉपीराइट असल्याचा दावा करण्यात येऊ शकत नसल्याने, चित्रपट प्रदर्शनावरील स्थगितीच्या मागणीची याचिका फेटाळण्यात येण्याची विनंती केली होती. अखेर याचिकाकर्त्यांकडून स्थगितीसाठीची याचिका मागे घेण्यात आली.
दरम्यान, मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटातून अतिशय संवेदनशील मुद्द्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ज्यामध्ये ऍसिड हल्ल्यातील पीडितेचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. विक्रांत मेसी आणि दिपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट १० जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.