`लुका छुपी` चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी `लुका छुपी` चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.
मुंबई : गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'सोनु के टीटू की स्वीटी'मधून लोकप्रिय झालेल्या कार्तिक आर्यनला यंदा पुन्हा एकदा प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. कार्तिक आर्यन आणि कृति सेनन यांचा बहुचर्चित चित्रपट 'लुका छुपी' शुक्रवारी प्रदर्शित झाला. 'लुका छुपी' कार्तिक आर्यनचा आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाचे चांगली कमाई केली आहे.
या कॉमिकल लव्ह स्टोरीने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी येणाऱ्या दोन दिवसांत, या वीकेंडला या कमाईचा आकडा वाढणार असल्याची शक्याता वर्तवली आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी ८.०१ करोड रूपयांची बंपर ओपनिंग केली आहे. २०११ साली आलेल्या 'प्यार का पंचनामा'ने ९२ लाख रूपये, २०१५ साली 'प्यार का पंचनामा २' चित्रपटाने ६.८० करोड रूपये तर २०१८ साली 'सोनू के टीटू की स्वीटी'ने ६.४२ करोड रूपये ओपनिंग केली होती.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'लुका छुपी' चित्रपटात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या कपलची गोष्ट दाखवण्यात आली आहे. चित्रपटात कार्तिक 'गुड्डू' आणि कृती 'रश्मी' या भूमिका साकारत आहेत. कार्तिक आणि कृती व्यतिरिक्त चित्रपटात अपारशक्ती खुराना, विनय पाठक आणि पंकज त्रिपाठी यांनीदेखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय आहे. 'कोका कोला' आणि 'पोस्टर लगवा दो' ही गाणी चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच हीट ठरली आहेत.
'लुका छुपी' चित्रपटानंतर आता बॉलिवू़ड अभिनेता कार्तिक आर्यन इम्तियाज अलीसोबत 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. 'लव आज कल' चित्रपट १० वर्ष आधी प्रदर्शित झाला असून चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.