कॅन्सरग्रस्त चाहत्याचं अजयला आवाहन, म्हणाला....
अजय देवगण नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. पण....
मुंबई : स्टंटबाजी म्हणू नका किंवा मग एखादी अफलातून भूमिका साकारत केलेला अभिनय. अजय देवगण नेहमीच चाहत्यांची मनं जिंकतो. विविध चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा अभिनेता मात्र सध्या काहीसा चिंतातूर असू शकतो. कारण, त्याचा चाहत्यांपैकीच एक असणाऱ्या आणि कर्करोग अर्थात कॅन्सरच्या आजाराशी झुंज देणाऱ्या एका चाहत्याने अजयला एक आवाहन केलं आहे. हे आवाहन आहे, त्याने तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात न करण्याविषयीचं.
समाजाप्रती असणारी आपली जबाबदारी ओळखत अजयने तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरातबाजी बंद करावी असं आवाहन राजस्थानच्या ४० वर्षीय नानकराम यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना केलं. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या नानकराम यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ते अजयचे चाहते होते. परिणामी तो जाहिरत करत असलेल्याच तंबाखूजन्स पदार्थांचं सेवन त्यांनी केलं. पण, या साऱ्याचे वाईट परिणाम आता त्यांच्या लक्षात आले.
तंबाखूजन्य पदार्थांची हीच जाहिरातबाजी रोखण्यासाठी म्हणून १००० पत्रकं छापत नानकराम यांनी जाहिरात पाहून या परार्थांचं सेवन केल्याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर नेमका कसा परिणाम झाला, याविषयी माहिती दिली. सोबतच जगतपूरा आणि नजीकच्या परिसरात अनेक ठिकाणी दर्शनीय भागात ही पत्रकं चिकटवण्यातही आली.
अजय देवगणची जाहिरात पाहून आपल्या वडिलांनी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन सुरू केल्याचं सांगत ते अजयचे चाहते असल्याची माहिची नानकराम यांचा मुलगा दिनेश मीना यांनी दिली. कर्करोगाचं निदान आणि या आजाराचं गांभीर्य पाहता अजयने अशा प्रकारच्या पदार्थांची जाहिरात करू नये अलं आवाहन खुद्द नानकराम यांनीच केल्याची माहिती त्यांच्या मुलाने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिली.