चला हवा येऊ द्या` : पॅरिसमध्ये हास्याचा धुमाकूळ घालण्यास सज्ज
लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला.
मुंबई : लंडनला निघालेलं वऱ्हाड लग्नाची बोलणी करुन लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आता पोहोचणार आहे रोमॅण्टिक सिटी पॅरीसला.
चला हवा येऊ द्याच्या मागच्या आठवड्यातील भागांमध्ये आपण पाहिलं की थुकरवाडीतली ही इरसाल मंडळी लंडनला पोहोचली होती. लंडनमध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलीशी गुलाब अर्थात भाऊ कदमचं लग्न लागणार आहे. मुलीच्या भावाने सारखपुड्याची भेट म्हणून या वऱ्हाडाला पॅरिसच्या सफरीला पाठवलं आहे. लग्नाची पुढची तयारीही पॅरीसमध्ये होणार आहे.
आता पॅरिसमध्ये आयफेल टॉवरच्या समोर हा लग्नसोहळा पार पडणार आहे. पण या लंडनवाल्या नकटीच्या लग्नातही सतराशे विघ्न आहेतच. या लग्नसोहळ्याची धमाल आपण येत्या सोमवार आणि मंगळवारच्या भागात पाहाणार आहोत. विश्वदौऱ्यावर निघालेली चला हवा येऊ द्याची टीम येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच २२ आणि २३ जानेवारीला, झी मराठीच्या प्रेक्षकांना घडवणार आहे पॅरिसची सफर. पॅरिसचा आयफेल टॉवर, शॅतो दे शॅन्तेली पॅलेस, फ्रॅगोनार्ड परफ्युम म्युझियम अशा वेगवेगळ्या ठिकाणांची सफर घर बसल्या तुम्हाला होणार आहे.
गुलाब आणि अँजेलिना पॅट्रिकच्या लग्नसोहळ्यातले अनेक छोटे मोठे समारंभ आणि लग्नाची बोलणी पॅरिसच्या शॅतो दे शॅन्तेली या राजवाड्यात पार पडणार आहेत. तर हा आगळावेगळा लग्नसोहळा अगदी खास मराठी पद्धतीने पार पडणार आहे तो सुद्धा भव्य दिव्य आयफेल टॉवरच्या साक्षीने.
जिथे मराठी तिथे झी मराठी म्हणत थुकरटवाडीतला गुलाब आणि त्याचं कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी पोहोचवत आहेत. दुबई, लंडननंतर पॅरिसला पोहोचलेली ही वारी इथेही धुमाकूळ घालणार आहे. कॉमेडीचं हे वारं पॅरिसच्या गुलाबी हवेलाही गुदगुल्या करत आपल्या रंगात रंगवण्यासाठी सज्ज आहे. तेव्हा या सोमवार आणि मंगळवारी पॅरिसमध्ये रंगणाऱ्या या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याची धमाल पाहायला विसरु नका