Chala Hawa Yeu Dya | अधिकारी होण्याची संधी असताना भारत गणेशपुरे अभिनेता का झाला?
लोकांना जसे दिसतंय तसे 4-6 वर्षांपासून माझा प्रवास सुरु नाही झाला, तर तो अगदी 30 वर्षापासून सुरु आहे.
मुंबई : अभिनयाचे आकर्षण कुठून तयार झाले असा प्रश्न भारत गणेशपुरे याला विचारले असता, दोन शहरांना क्रेडिट देत तो म्हणाला, मला दोन शहरांनी नट बनवलं. पहिले म्हणजे दर्यापूर तेथे मी एका ऑरकेस्टात शिकायला जायचो आणि दुसरे चांदूर बाजार. माझ्या वडिलांची बदली झाल्यामुळे मी चांदुर बाजारला शिफ्ट झालो. तिथे एक गोष्ट महाराष्ट्रापेक्षा वेगळी घडायची ती म्हणजे, त्या वेळेस तेथे 3 अंकी नाटकांची स्पर्धा व्हायची आणि मी त्याच्यात भाग घ्यायचो, मी 2-3 नाटकं केली ज्याच्यात मला पुरस्कार मिळाले.
मग अमरावतीच्या कॅालेजमध्ये गेलो, तिथे ही मी नाटक करायला सुरवात केली आणि मग हे सर्व सुरु झाले. म्हणजे लोकांना जसे दिसतंय तसे 4-6 वर्षांपासून माझा प्रवास सुरु नाही झाला, तर तो अगदी 30 वर्षापासून सुरु आहे.
BSC Agri तू केलंस आणि BSC Agriचे विद्यार्थी अधिकारी होतात, मग अभिनयामध्ये कसं काय आलास? हा प्रश्न विचारला असता. माझं आधीपासूनच ठरलं होतं की, अभिनय क्षेत्रात जायचे पण त्याआधी डिग्री ही घ्यायचीच, असे भारतने सांगितले.
पुढे तो सविस्तर पणे सांगतो की, "मला BA करायचे होते कारण ती 3 वर्षांची डिग्री असते आणि ऍग्रीकलचर ही 4 वर्षांची डिग्री आहे. मला एक वर्ष फुकट घालवायचा नव्हता, परंतु मी दहावी बारावी सायन्समधून केल्यामुळे मला ऍग्रीकलचर करायला बाबांनी सांगितले. तसा मला शिक्षणात रसं नव्हते. मी गणितात खूप वीक होतो. परंतु मित्रांच्या सहवासात मला अभ्यास करायची सवय लागली आणि मी बिघडलो. माझ्याकडून चांगले मार्क आणण्याची अपेक्षा बाबांना नव्हती, पण तरीही मी फस्ट क्सालची डिग्री घेऊन पास झालो.
'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.