मुंबई : 'चला हवा येऊ द्या' Chala Hawa Yeu Dya या कार्यक्रमाला आजवर प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. पण, सध्या मात्र प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या या कार्यक्रमाने अनेकांचा रोष ओढावला आहे. हा रोष ओढावण्यामागचं कारण म्हणजे कार्यक्रमातील एका भागातून व्हायरल होणारा एक फोटो. ज्यामध्ये या कार्यक्रमातील कलाकार हे राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या रुपात असल्याचं भासवण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्याऐवजी कलाकारांचे चेहरे लावण्यात आल्यामुळे हे महापुरुषांची प्रतिमा मलिन करणारं कृत्य असल्याचं म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर कार्यक्रमाविरोधात पोस्ट लिहिल्या गेल्या. खुद्द छत्रपती संभाजी राजे यांनीही या प्रकरणी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाविषयी निर्माण झालेलं हे वातावरण पाहता अखेर निलेश साबळेने झी मराठी वाहिनीच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये निलेश झाल्या प्रकरणी स्पष्टीकरण देत असून, खरी गोष्ट सर्वांपुढे मांडत आहे. सोबतच ही तांत्रिक चूक असल्याचं म्हणत दिलगिरीही व्यक्त करत आहे. 


'खरंतर ते स्कीट आणि तो फोटो एका वेगळ्या अर्थाने एका वेगळ्या कारणासाठी दाखवण्यात आला होता. पण, त्यामुळे वाद आणि गैरसमजही निर्माण झाले. त्यातून कोणत्याही महापुरुषांचा किंवा महान व्यक्तींचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नसेलही. छत्रपती राजर्षी शाहू महाराज असो किंवा या देशातील सर्व महान व्यक्ती, त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे', असं निलेश म्हणाला. .



कार्यक्रमात जो फोटो वापरण्यात आला होता, तो राजर्षी शाहू महाराजांचा नव्हता. पण, तो ज्या राजांचा होता त्यासाठीही मी दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत तांत्रिक गोष्टीतून झालेल्या त्या चुकीसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दांत निलेशने स्पष्टीकरण दिलं. निलेशच्या या व्हिडिओवर लगेचच नेटकरीही व्यक्त झाले आणि त्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण, त्यातही संताप आणि नाराजीचा सूर मात्र कायम होता. त्यामुळे आता प्रेक्षक निलेशच्या या माफीनाम्याचा स्वीकार करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.