`चला हवा येऊ द्या`च्या विनोदवीरांना मिळालं एक सुंदर सरप्राईज
झी मराठी अवॉर्ड 2019
मुंबई : सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजले की प्रत्येक घरात एक हास्याचं वादळ येतं आणि हे वादळ घेऊन येतात झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'मधील विनोदवीर. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं.
प्रेक्षकांनी हसायलाच पाहिजे यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या या विनोदवीरांनी गेली ४ वर्ष या 'चला हवा येऊ द्या'च्या हवेचं वादळ केलं आणि महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगाला हसायला भाग पाडलं. नुकतंच या विनोदवीरांना एक छान सरप्राईज वाहिनीकडून मिळालं. नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१९च्या मंचावर सागर कारंडे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे या विनोदवीरांची भेट त्यांच्या मातोश्रींशी करून देण्यात आली. या सोहळ्यात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची ओळख या कलाकारांच्या आईशी होणार आहे.
या विनोदवीरांच्या हस्ते त्यांच्या आईंना एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. खुद्द आईच्या तोंडून कौतुक आणि आतापर्यंतच्या संघर्षाची गोष्ट ऐकताना नेहमी सगळ्यांना हसवणाऱ्या या कलाकारांचे डोळे मात्र पाणावले. पण झी मराठी अवॉर्ड्सच्या मंचावर झालेली हि त्यांची भेट, हे एक सुंदर सरप्राईज ते कधीच विसरणार नाही असे होते. या विनोदवीरांच्या मातोश्री त्यांच्याबद्दल काय म्हणाल्या हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड्स २०१९, रविवार २० सप्टेंबर संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.