मुंबई :  एका वेगळ्या विषयावरचा सिनेमा रोहन थिएटर्स ही सिनेसंस्था आपल्या भेटीला घेऊन येत आहे. ज्या चित्रपटाचं नाव 'अनान' असं असून या सिनेमाचं टीझर पोस्टर डिजीटली लाँच करण्यात आलं. अवघ्या दोन दिवसांत या टीझर पोस्टरला एक लाख व्ह्यूज मिळाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच लाँच झालेल्या या पोस्टरवर 'नटराज' च्या मूर्तीसमोर उभी असलेली एक जोडी आपल्याला दिसते ज्यात प्रार्थना एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे तर पोस्टरमधील नायक मात्र अद्याप समोर आलेला नाही. 



या पोस्टरवर स्वर्णाक्षरात लिहिलेलं 'अनान' हे चित्रशीर्षक... या शब्दाचा अर्थ काय? आणि या चित्रपटातून नेमकं काय मांडण्याचा प्रयत्न केला आहे? प्रार्थनाच्या जोडीला अजून कोणते चेहरे या वेगळ्या विषयाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आणि या चित्रपटातून कोणता नवीन विषय मराठीत प्रवेश करणार या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे.


'अनान' या चित्रपटातून 'रोहन थिएटर्स' चे रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया निर्माते म्हणून मराठीत पदार्पण करत असून या चित्रपटाची कथा हेमंत भाटीया यांची आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलं आहे तर पटकथा – संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत. दिग्दर्शनाबरोबरच गीतलेखनाची धुरा ही राजेश कुष्टे यांनी पेलली आहे.