`संस्कार`प्रिय `बाबुजीं`च्या अडचणीत वाढ
बाबुजींना आणखी मोठा धक्का
मुंबई: लैंगिक अत्याचार, शोषण या प्रकरणात आता कलाविश्वातील संस्कारी अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या बाबूजी म्हणजेच अभिनेते आलोकनाथ यांचंही नाव गोवलं गेलं आहे.
१९९४ मध्ये गाजलेल्या 'तारा' या मालिकेच्या लेखिका असणाऱ्या विनता नंदा यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले असून, आता बाबुजी चांगलेच अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे.
विनता नंदा यांनी फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी कुठेच आलोकनाथ यांच्या नावाचा उल्लेख केला नसला तरीही एकंदर पोस्ट आणि विनता यांच्यासोबत करण्यात आलेला दुर्व्यवहार पाहता त्यांना नेमके कोणावर आरोप करायचे आहे, हे पोस्ट वाचणाऱ्यांच्याही लक्षात येत आहे.
दरम्यान, विनता यांनी ती पोस्ट लिहिल्यानंतर 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन' म्हणजेच 'सिंटा' आलोकनाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
कार्यक्रमांच्या लेखिकेकडून करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांविषयी आता 'बाबुजी' नेमकी काय कारणं देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, 'सिंटा'चे सदस्य सुशांत सिंह यांनीही झाल्या प्रकरणी नाराजी व्यक्त करत 'सिंटा'चे प्रसिनिधी म्हणून आपण आलोकनाथ यांना नोटीस पाठवणार असल्याचं स्पष्ट केलं.
नोटीस पाठवण्याच्या या प्रक्रियेसाठी काही वेळही जाऊ शकत असल्याचं त्यांनी ट्विट करत म्हटलं. त्याशिवाय विनता यांनी सदर प्रकरणाची तक्रार दाखल करावी, आमचा तुम्हाला पाठिंबा असेल ही महत्त्वाची बाबही अधोरेखित केली.