मुंबई : सध्याच्या घडीला कलाविश्वात लग्नसराईचेच वारे वाहात आहेत असं म्हणायला हरकत नाही. मुख्य म्हणजे यंदाचं पूर्ण वर्ष हे कलाविश्वात खऱ्या अर्थाने लग्नसराईचं वर्ष ठरत आहे. सोनम कपूरपासून आता दीपिका पदुकोणपर्यंत बऱ्याच प्रसिद्ध चेहऱ्यांनी विवाहबंधनात अडकत आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवाहबंधनात अडकणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आता आणखी एक नाव जोडलं जाण्याची चिन्हं आहेत. 


तो सेलिब्रिटी म्हणजे विनोदवीर, अभिनेता कपिल शर्मा. 


एकिकडे छोट्या पडद्यावर पुनरागमनाच्या तयारीत असणाऱ्या कपिलने आता लग्न करण्याचा निर्णय घेतला असून तो लग्नाच्या तयारीमध्येही व्यग्र दिसत आहे. 


१२ डिसेंबरला कपिल आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ हे लग्न करणार असल्याचं कळत आहे. 


सुत्रांचा हवाला देत 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कपिलच्या खास मित्रांना १२ डिसेंबरदरम्यानच्या दिवशी वेळ काढण्यास सांगण्यात आलं आहे. येत्या काळात तो स्वत: याविषयीची अधिकृत घोषणा करण्याची चिन्हं आहेत. 


कपिल शर्मा सध्याच्या घडीला त्याच्या पुनरागमनावरच जास्त लक्ष केंद्रीत करत असून येत्या काळात तो स्वत:सुद्धा या लग्नाच्या तयारीमध्ये व्यग्र होणार आहे. 


कपिलच्या मूळ गावी हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचं म्हटलं जात असून त्याच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असल्याचं स्पष्ट होत आहे. 


खुद्द कपिलनेही काही दिवसांपूर्वी त्याच्या विवाहसोहळ्याच्या बातमीला दुजोरा दिला होता. त्यामुळे आता विनोदवीराची ही बिग फॅट पंजाबी वेडिंग नेमकी असणार तरी कशी हे पाहण्यासाठीच चाहत्यंमध्ये आणि कलाविश्वामध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.