कॉमेडी किंग कपिल शर्माची हॉलिवूडमध्ये एन्ट्री
वेगळ्या अंदाजात येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिल शर्मा हॉलिवूडचा सुपरहिट अॅनिमेटेड चित्रपट 'अॅंग्री बर्ड २' मधील प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रेड' या पात्रासाठी आवाज देणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली. २३ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कपिल शर्मा 'अॅंग्री बर्ड २'च्या हिंदी वर्जनमधील प्रमुख 'रेड' या पात्राला आपला आवाज देणार आहे. 'अॅंग्री बर्ड २'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र हिंदी वर्जनचा ट्रेलर अद्याप प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
कपिल, कॉमेडी किंग असण्यासह एक उत्तम गायकही आहे. कपिल अनेकदा विविध कलाकारांची मिमिक्रीही करताना पाहायला मिळतो. आता 'अॅंग्री बर्ड २'च्या हिंदी वर्जनमधून कपिलचा एक वेगळा अंदाज चाहत्यांसमोर येणार आहे.
२०१६ मध्ये आलेल्या 'अॅंग्री बर्ड'चा 'अॅंग्री बर्ड २' हा सिक्वल आहे. हा अॅनिमेटेड चित्रपट थ्योरप वॅन ओरमन यांनी दिग्दर्शित केला आहे.
'अॅंग्री बर्ड २' हिंदीव्यतिरिक्त तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनेक हॉलिवूड चित्रपटांच्या हिंदी वर्जनसाठी आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे. १९ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' चित्रपटाच्या हिंदी वर्जनसाठी शाहरुखने 'मुसाफा' तर, आर्यनने 'सिम्बा' या प्रमुख पात्रांसाठी आवाज दिला. आता 'अॅंग्री बर्ड २'मधील 'रेड' या पात्राच्या आवाजासाठी कपिल शर्माला प्रेक्षकांची किती पसंती मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.