सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला जेलमधून दिल्या Valentine`s Day शुभेच्छा, म्हणाला `तिला सांगा...`
Sukesh Chandrashekhar Valentines Day: 200 कोटी घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला Valentine`s Day च्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तिच्या आरोपांवर भाष्य करण्यास नकार देताना तिची काही कारणं नसल्याचं म्हटलं आहे.
Sukesh Chandrashekhar Valentines Day: 200 कोटी घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) Valentine's Day च्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोर्टात हजर केलं असता सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar ) पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "तिला माझ्याकडून हॅप्पी व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा द्या". नुकतंच जॅकलीनने कोर्टात बोलताना सुकेश आपल्या भावनांशी खेळला असून, आपलं आयुष्य नरक बनवलं असल्याचं म्हटलं होतं. सुकेश चंद्रशेखर सध्या जेलमध्ये असून यामध्ये जॅकलीनचाही उल्लेख होत असल्याने वारंवार तिला कोर्टाच्या चकरा माराव्या लागत आहेत.
दरम्यान सुकेशला जॅकलीन फर्नांडिसकडून करण्यात आलेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलं असता त्याने काही भाष्य करण्यास नकार दिला. हे सगळं बोलण्यासाठी तिच्याकडे अनेक कारणं आहेत असं सुकेशने यावेळी सांगितलं.
सुकेशने नुकतंच अभिनेत्री चाहत खन्नाला 100 कोटींची नोटीस पाठवली आहे. चाहत खन्नाने एका मुलाखतीत आपल्यासंबंधी चुकीचं विधान केलं असल्याचं सुकेशने म्हटलं आहे. यामुळे आपली प्रतिमा मलीन झाल्याचा त्याचा दावा आहे.
दिल्ली पोलिसांनी सोमवारी कोर्टात सांगितलं की, सुकेश चंद्रशेखरचा जवळची सहकारी पिंकी इराणीने त्याची आणि जॅकलीनची भेट घडवून आणली होती. यानंतर 200 कोटींची वसूली करण्याच्या प्रकरणात तिला गोवण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती शैलेंद्र मलिक यांच्यासमोर दाखल केलेल्या आरोपपत्रात हा आरोप केला आहे. आरोपपत्रासंबंधी कोर्ट मंगळवारी निर्णय घेऊ शकतं.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar) जॅकलिन फर्नांडिसला आरोपी करण्यात आलं आहे. अंमलबजावणी संचालनालयाने तिच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. जॅकलिनला सुकेशने कोट्यवधींचे गिफ्ट दिल्याचा आरोप आहे. सुकेशने वापरलेला हा पैसा 200 कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणातला होता. जॅकलिनला याची पूर्वकल्पना असताना तिने ही भेटवस्तू स्वीकारल्यामुळे जॅकलिनला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.