`आता काश्मिरी मुलगी माझ्याशी लग्न करण्यास तयार असेल तर... `
अभिनेता बरळला...
मुंबई : सोमवारी देशाच्या आणि जम्मू काश्मीरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला. अनुच्छेद ३७० रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत मांडलाय. त्यांनी मांडलेल्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर देशभरात एकच उत्साह पाहायला मिळाला. सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटले.
प्रत्येकानेच आपल्या परिने व्यक्त होत या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतप्रदर्शन करण्यास सुरुवात केली. यातही काही प्रतिक्रिया लक्ष वेधून गेल्या. त्यातील एक प्रतिक्रिया होती स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खान याची.
जम्मू- काश्मीर मुद्द्यावरील निर्णयाची माहिती मिळताच केआरकेने एकामागोमाग एक ट्विट करण्यास सुरुवात केली. त्याने नेहमीच्याच शैलीत उथळपणे प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्ययाचं स्वागत केलं. 'काही काळापूर्वी आपल्याला मोदी, मोदी सरकार आवडत नव्हतं कारण त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नव्हती. पण, आता मात्ल ते मला फारच आवडत आहेत. कारण, त्यांनी आस्वासनं पूर्ण केली आहेत', असं त्याने एका ट्विटमध्ये लिहिलं. तर, येत्या काळात त्यांनी राम मंदिर उभारण्याविषयी दिलेलं आश्वासनही पूर्ण करावं अशी मागणी त्याने केली.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या मैत्रीला आदर्शस्थानी ठेवत ते कठिणातील कठिण परिस्थितीमध्ये एकमेकांची साथ कधीच सोडत नाहीत ही बाब त्याने ट्विटमध्ये मांडली. जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेला अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलेल्या निर्णयाविषयी आणखीही एक ट्विट त्याने केलं. 'आता कोणी सुंदर काश्मिरी मुलगी माझ्याशी लग्न करण्यासाठी सज्ज असेल, तर मी (तेथे) एखादा बंगला खरेदी करण्यासाठी तयार आहे. चला.... या स्वर्गात एक चांगलं आयुष्य व्यतीत करुया', असं त्याने या ट्विटमध्ये लिहिलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार सेलिब्रिटींवर निशाणा साधणाऱ्या केआरकेच्या ट्विटचा हा रोख पाहता, आता पुढे तो आणखी काय बरळणार, हाच प्रश्न काही नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.