मुंबई : अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर स्टारर 'कुली नं. १' या १९९५ साली आलेल्या चित्रपटाची जादू आजही प्रेक्षकांवर आहे. त्यानंतर आता पुन्हा 'कुली नं. १'चा रिमेक करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 'कुली नं. १'च्या रिमेकमध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चित्रपटात दाखवण्यात आलेल्या करिश्मा कपूरच्या वडिलांची म्हणजेच कादर खान यांची आयकॉनिक भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता होती. आता याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वरुणने नुकत्याच आपल्या सोशल मीडियावरुन या आगामी कॉमेडी चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. चित्रपटात वरुण धवन आणि सारा अली खान पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यानंतर आता चित्रपटातील महत्त्वपूर्ण इतर पात्रांची नावंही समोर येत आहेत. कादर खान यांच्या जबरदस्त भूमिकेसाठी डेविड धवन यांनी परेश रावल यांची निवड केल्याचं समोर आलं आहे. 'बॉलिवूड लाईफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपट निर्मात्यांनी नुकताच याबाबत खुलासा केला आहे. 



परेश रावल यांनी विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अक्षय कुमार, सुनिल शेट्टीच्या 'हेराफेरी' चित्रपटातून परेश रावल यांना खास ओळख मिळाली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर 'संजू', त्यानंतर विक्की कौशलच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' मध्येही परेश रावल यांनी भूमिका साकारली होती.