मोदींचं आव्हान, खिलाडी कुमारचा प्रतिसाद, कोरोनाशी लढण्यासाठी २५ कोटींची मदत
जगभरामध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस भारतातही पोहोचला आहे.
मुंबई : जगभरामध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस भारतातही पोहोचला आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे १६७ रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जनतेने येत्या काही दिवसात घराबाहेर पडू नये, असं आवाहन सगळेच करत आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी तुमच्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे. तुमचं छोट्यातलं छोटं दान आम्ही स्वीकारू, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. मोदींच्या या आवाहानाला बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने एका तासाच्या आत प्रतिसाद दिला. कोरोनाचा हा वाढता धोका लक्षात घेता बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार मदतीला धावला आहे. अक्षय कुमारने प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. याबाबतचं एक ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.
'या काळामध्ये आपल्या लोकांच्या जीवाचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे. यासाठी आपल्याला सगळं काही केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहायता निधीमध्ये मी २५ कोटी रुपये देत आहे. चला आयुष्य वाचवूया. जान है तो जहान है,' असं ट्विट अक्षय कुमारने केलं आहे.
अक्षय कुमार याच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये आणि प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये दिले आहेत.