कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्या राजकीय दिग्गजांचे कोरोना रिपोर्ट नेगेटीव्ह
कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याचा आरोप तिच्यावर होतोय.
लखनऊ : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लंडनहून परतल्यानंतर तिने एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत अनेक राजकीय दिग्गजही उपस्थित होते. त्यामुळे त्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील राजकीय मंडळी आणि उपस्थित असलेल्या अन्य लोकांचे रिपोर्ट नेगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह, माजी मुख्यमंत्री वसंधुरा राजे, त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह हे देखील उपस्थित होते. शिवाय कनिकावर कोरोना प्रकरणी माहिती लपवल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तिला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी रात्री लखनऊच्या सरोजनी नगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहीती लपल्याचा आरोप तिच्यावर होतोय. उत्तर प्रदेश सरकारने ती उपस्थित असलेल्या सर्व पार्ट्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कनिका कपूरचे कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी मोठे निर्णय घेतले. उत्तर प्रदेशमध्ये सर्व मॉल्स बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली कनिका शुक्रवारी भारतात परतली. त्यानंतर तिला जवळपास पाच दिवस ताप होता. हे सर्व कोरोनाचे लक्षणं असल्याचे तिच्या लक्षात येताच तिने स्वत:ची कोरोना चाचणी केली आणि तिचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे तिला लखनऊच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
कनिकाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. तिने काय म्हटले आहे पोस्टमध्ये ?
'सर्वांना नमस्कार, गेल्या चार दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसून आली आहेत, माझी स्वतःची चाचणी घेतली गेली आणि ती कोविड -१९ positive आहे. मी आणि माझे कुटुंबीय आता पूर्णपणे अलग आहोत आणि पुढे कसे जायचे या वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरन करीत आहोत. मी ज्या लोकांच्या संपर्कात आहे त्यांचे संपर्क मॅपिंग तसेच सुरू आहे. १० दिवसांपूर्वी जेव्हा मी घरी परतले, तेव्हा सामान्य प्रक्रियेनुसार मला विमानतळावर स्कॅन केले गेले. पण तसे काही दिसून आले नाही. मी नॉर्मल असल्याचे दिसून आले.