गायिकेचा अनू मलिक यांच्यावर गंभीर आरोप
लैंगिक शोषणाच्या वादात पुन्हा अडकले....
मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्तने भारत देशात उदयास आणलेलं #Metoo वादळ अद्याप शमलेलं नाही. या मोहीमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामध्ये म्यूजिक डायरेक्टर अनु मलिकचे देखील नाव होते. गायक सोना महापात्रा आणि श्वेता पंडितने त्यांच्यावर गतवर्षी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. त्या आरोपांनंतर अनु मलिक पुन्हा एकदा #Metoo च्या प्रकरणात अडकले आहेत.
गुरूवारी गायक सोना महापात्राच्या एका ट्विटवर कमेंट करत गायक नेहा भसीनने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा खुलासा करत अनु मलिक यांच्यावर गैरव्यवहार करण्याचा आरोप केला आहे. 'आपल्याला जागे होण्यासाठी 'निर्भया'सारखी घटना पुन्हा होण्याची गरज आहे का?' असा प्रश्न सोना महापात्राने ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
तिच्या संतापजनक वक्तव्यावर कमेंट करत नेहा भसीन म्हणते की, 'मी तुझ्या ट्विटवर सहमत आहे. आपण एका सेक्सिस्ट समाजात वावरतो. अनु मलिक एक नराधम आहे. त्यांच्या वाईट कृत्यामुळे मी देखील एकेकाळी पळ काढला होता. मी तेव्हा फक्त २१ वर्षांचे होते. त्यावेळेस ते स्टुडिओत सोफ्यावर बसले होते आणि माझ्या डोळ्यांबद्दल बोलत होते. '
तेव्हा गोंधळत असलेल्या नेहाने माझी आई खाली वाट पाहत आहे असे सांगत पळ काढला. 'त्यानंतर त्यांनी मला अनेक फोन देखील केले. परंतु त्यांच्या कोणत्याच फोनला मी उत्तर दिले नाही.' नेहा तिच्या गाण्याची सीडी घेवून तिचा आवाज ऐकवण्यासाठी गेली होती. कारण अनु मलिक एक प्रसिद्ध म्यूजिक डायरेक्टर आहेत. परंतु त्यांनी असे करायला नको हवं होत असं वक्तव्य नेहाने केलं आहे.
गत वर्षी अनु मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांना सिंगिंग रिऍलिटी शोच्या परिक्षकाच्या पदा वरून बेदखल करण्यात आलं होते. सध्या ते सिंगिंग रिऍलिटी शोच्या नवीन भागात परिक्षकाची धुरा सांभाळत आहेत. आता येत्या काळात नेहा भसीनच्या आरोपाचे काय पडसाद उमटतील हे पाहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.