मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सोशल मीडियावर नवी लढाई सुरु झाली आहे. अनेकांनी दीपिकाने ठामपणे घेतलेल्या या भूमिकेचे कौतुक केले आहे. तर काही भाजप समर्थकांनी दीपिकावर टीका करत ट्विटर आणि तत्सम सोशल मीडिया व्यासपीठांवर तिला अनफॉलो करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुधवारी ट्विटरवर #boycottchhapaak आणि #BlockDeepika हे दोन हॅशटॅग ट्रेंडमध्ये होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिकाच्या 'छपाक'विरोधात सोशल मीडियावर मोहीम; प्रकाश जावडेकर म्हणतात...




मात्र, या मोहिमेमुळे दीपिकाचे फॉलोअर्स कमी होणे तर सोडाच पण याचा उलटाच परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला ट्विटरवर दीपिकाचे साधारण २९ कोटी फॉलोअर्स आहेत. 'सोशल ब्लेड' या संकेतस्थळाच्या माहितीनुसार, गेल्या आठवडाभरात दीपिकाच्या नव्या फॉलोअर्सची संख्या नेहमीच्या गतीने वाढत होती. मात्र, दीपिका पदुकोणने 'जेएनयू'त हजेरी लावल्यापासून तिला फॉलो करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. 





त्यामुळे अनेकजण चक्रावून गेले आहेत. #boycottchhapaak आणि #BlockDeepika च्या माध्यमातून दीपिकाविरोधात पद्धतशीर मोहीम राबवूनही तिचे फॉलोअर्स वाढलेच कसे, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे. जाणकारांच्या मते यासाठी दीपिकाच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर चालवण्यात येत असलेली मोहीम कारणीभूत आहेत. ज्याप्रमाणे विरोधक दीपिकाविरोधात हॅशटॅग व्हायरल करत आहेत, त्याचप्रमाणे दीपिकाचे चाहते #IStandWithDeepika हा हॅशटॅग वापरून दीपिकाच्या समर्थनार्थ ट्विट करत आहेत. त्यामुळे दीपिकाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. याची परिणती तिच्या फॉलोअर्सची संख्या वाढण्यात होत असावी, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.