नैराश्यात गेलेल्या अभिनेता अपूर्व शुक्लाचे निधन; खिशातल्या मोबाईल नंबरवरुन उलघडलं मृत्यूचं रहस्य
Bhopal theater artist Apoorva Shukla Death : अनेक दिवसांपासून नैराश्यात असलेल्या अभिनेता अपूर्व शुक्ला याचे बुधवारी भोपाळमध्ये निधन झालं आहे. शुक्ला हा सुमारे दीड महिन्यापासून बेवारस असल्यासारखा राहत होता.
Bhopal theater artist Apoorva Shukla Death : सिनेजगतातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अभिनेता अपूर्व शुक्ला याचे निधन झाले आहे. चित्रपट जगत आणि अनेक माहितीपटांमध्ये काम करणारा अभिनेता अपूर्व शुक्ला याने बुधवारी भोपाळच्या हमीदिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. 35 वर्षीय अपूर्व शुक्ला हा गेल्या काही काळापासून नैराश्याने त्रस्त होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. चित्रपटांव्यतिरिक्त अपूर्व शुक्लाने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. अपूर्व पत्रकारितेच्या जगातही सक्रिय होता.
अभिनेता अपूर्व शुक्ला भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटल कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रात्र निवारामध्ये आपले जीवन जगत होता. अपूर्व शुक्लावर त्याच्या मित्रांनी अंत्यसंस्कार केले आहेत. भोपाळ पोलिसांनी सांगितले की, बुधवारी हमीदिया रुग्णालयामधून माहिती मिळाली की हॉस्पिटलच्या आवारात रात्र निवारामध्ये राहणाऱ्या 35 वर्षीय व्यक्तीचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. मृताच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या कागदावर मोबाईल क्रमांक लिहिला होता. पोलिसांनी त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला तेव्हा त्यांना कळले की मृत व्यक्ती अपूर्व शुक्ला आहे आणि तो फोन नंबर त्याच्या मावशीचा आहे.
वडिलांच्या निधनानंतर अपूर्व शुक्ला नैराश्यामध्ये गेला होता. नंतर त्याने रात्र निवारागृहात राहणं सुरु केले. आकर्षक चेहरा असलेल्या अपूर्वाला थिएटरची आवड होती. नाटकांमध्ये पात्रे साकारण्याची आवड असल्याने त्याला चित्रपटांमध्येही छोट्या-छोट्या भूमिका मिळायच्या. अपूर्व आधी वडील पंकज शुक्ला आणि आई इंदिरा शुक्ला यांच्यासोबत जहांगीराबादच्या अहिर मोहल्लामध्ये राहत होता. पंकज शुक्ला हे ज्येष्ठ पत्रकार होते, तर त्यांच्या पत्नी वकील होत्या. सुमारे 3 वर्षांपूर्वी आईचे निधन झाल्याने अपूर्वला जबर धक्का बसला होता. आईच्या निधनानंतर अवघ्या एक वर्षातच त्याच्या मनातून वडिलांची सावलीही नाहीशी झाली. त्यामुळे अपूर्व नैराश्यात गेला.
अपूर्व शुक्लाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने चित्रपटांसोबतच काही टीव्ही शोमध्ये काम केले होते. काही महिन्यांपूर्वी त्याने भोपाळमध्ये चित्रित झालेल्या हनक या वेबसिरीजमध्ये गँगस्टर मायाशंकरची भूमिका साकारली होती. ही वेब सिरीज गँगस्टर विकास दुबेच्या जीवनावर आधारित होती. अपूर्वने चक्रव्यूह, सत्याग्रह, गंगाजल आणि तबादला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले. याच काळात त्याला दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. तसेच अमिताभ बच्चन, अजय देवगण, अर्जुन रामपाल, करीना कपूर आणि सिद्धार्थ राय यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबतही त्याने काम केले होते.